वृत्तसंस्था/ बेंगळूर
हॉकी इंडियाने लॉकडाउननंतर पुन्हा एकदा सरावसत्रे सुरु झाल्यावर सहभागी खेळाडूंना आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करण्याचे आदेश दिले आहेत. सरावसत्रात सहभागी खेळाडूंच्या आरोग्यावर या ऍपद्वारे नजर ठेवण्यात येणार असून केवळ ‘सुरक्षित’ किंवा ‘कमी धोका’ असणाऱया खेळाडूंनाच यात सहभागी होण्यास अनुमती दिली जाणार असल्याचे हॉकी इंडियाने यावेळी स्पष्ट केले. यासाठी हॉकी इंडियाने एक नियमावली पुस्तिका तयार केली असून सर्व राज्य संघटनांना देण्यात आली असल्याचे हॉकी इंडियाने स्पष्ट केले.
केंद्र सरकारने सर्व राज्यातील नागरिकांना हे ऍप डाउनलोड करण्याचे सक्तीचे केले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हॉकी इंडियाच्या कर्मचाऱयांनादेखील हे ऍप वापरावे लागणार आहे. विशेष म्हणजे, आरोग्य सेतू या ऍपमधील मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व खेळाडू आणि कर्मचाऱयांना आगामी स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी आरोग्य सेतुवर स्टेटस दाखवावे लागणार आहे. सरावसत्रात सहभागी होणारा एखादा खेळाडू ‘हाय रिस्क’ वर असेल तर त्याला क्वारटांईन व्हावे लागणार असल्याची माहितीही हॉकी इंडियाने आपल्या नियमावलीत दिली आहे.









