क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
हैदराबाद एफसीने यंदाच्या आयएसएल फुटबॉल मोसमात आपली आघाडीफळी मजबूत करण्याच्या यत्नात स्पेनचा स्ट्रायकर झेवियर सिवेरियो याच्याशी करार केला आहे. 23 वर्षीय आणि सहा फूट उंचीचा झेवियर सिवेरियो याला प्रोफेशनल फुटबॉलचा प्रचंड अनुभव आहे.
आपले फुटबॉल करीयर लागूना या स्पेनच्या संघाकडून खेळून सुरूवात केलेल्या झेवियर सिवेरियो त्यानंतर 2015 फुटबॉल मोसमात स्पेनीश सेगुंदा डिव्हीजनचा संघ लास पाल्मास संघाला खेळला. वयाच्या 19व्या वर्षी तो लास पाल्मासच्या ब संघाला खेळला. त्यावेळी 2016-17 फुटबॉल मोसमात त्या संघाचे सध्याचे हैदराबाद एफसी संघाचे प्रशिक्षक मानोलो मार्कीझ होते.
झेवियर सिवेरियो हा एक उत्कृष्ट फिनिशर असून हेडींगवर गोलही करण्यात तो माहिर आहे. रेसिंग सातांदेर या संघासाठी खेळताना त्याने 22 सामन्यांत 16 गोल केले होते. त्यानंतर दुसऱया सीझनमध्ये त्याने 24 गोल केले. हैदराबाद एफसीने या आयएसएल मोसमात बार्थोलोमियाँव ओगबेचे, एदू गार्सिया, जुआनन आणि आता झेवियर सिवेरियो असे चार विदेशी फुटबॉलपटू करारबद्ध केले आहेत.









