सनरायजर्स अद्याप पहिल्या विजयाच्या शोधात, दोन्ही सलामीवीरांच्या अपयशाची मुख्य चिंता
चेन्नई / वृत्तसंस्था
विजयश्रीने उत्तम प्रारंभ करणाऱया रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचा आज (दि. 14) आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध देखील तीच विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असेल. यापूर्वी, आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध सलामी लढतीत सहज विजय संपादन केला तर डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबादला कोलकाताविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी साकारणाऱया आरसीबी संघात या लढतीसाठी देवदत्त पडिक्कलचे आगमन होत असून त्यामुळे त्यांची फलंदाजी लाईनअप आणखी भक्कम असेल. यापूर्वी, पहिल्या लढतीत आरसीबीतर्फे विराट व शार्दुल सलामीला उतरले होते. आज विराट-देवदत्त सलामीला उतरण्याची शक्यता असेल.
पडिक्कलने आपण 100 टक्के तंदुरुस्त असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले असून प्रथमश्रेणी क्रिकेटमधील बहारदार फॉर्म कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. दि. 22 मार्च रोजी त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर तो आयसोलेट होता. नंतर मात्र यावर त्याने मात केली आणि निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्याने संघसहकाऱयांसमवेत ताकदीने सरावाला सुरुवात केली.
आरसीबीचा संघ येत्या काही सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन व ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर ऍडम झाम्पाला आजमावून पाहू शकेल, असे चित्र आहे. कोहली व डीव्हिलियर्स यांच्यासारखे अव्वल दर्जाचे फलंदाज असल्याने आरसीबीची फलंदाजी भक्कम आहे. शिवाय, ग्लेन मॅक्सवेलने देखील आपला फॉर्म मागील सामन्यात दाखवून दिला आहे. अर्थात, कोहली, डीव्हिलियर्स, मॅक्सवेल यांचा अपवाद वगळता अन्य लाईनअपमध्ये बरीच पोकळी आहे आणि त्यामुळे देवदत्त पडिक्कल बहरात असणे आरसीबीसाठी महत्त्वाचे ठरत जाणार आहे.
कर्नाटकाचा 20 वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त मागील आयपीएल हंगामात 15 सामन्यात संघातर्फे सर्वाधिक 473 धावांची आतषबाजी करण्यात यशस्वी ठरला होता. यंदाही आरसीबीला अशाच तडफदार फलंदाजीची अपेक्षा आहे.
हैदराबादला सलामीची चिंता
यापूर्वी केकेआरविरुद्ध पहिल्या लढतीत वृद्धिमान साहा व डेव्हिड वॉर्नर हे दोन्ही सलामीवीर सपशेल अपयशी ठरले होते आणि हैदराबादसाठी ही सध्याची मुख्य चिंता आहे. वॉर्नरच्या साथीला जॉनी बेअरस्टोला सलामीला उतरवण्याचा पर्याय या संघाकडे उपलब्ध असेल. बेअरस्टोने केकेआरविरुद्ध मध्यफळीत फलंदाजीला उतरताना शानदार अर्धशतक झळकावले होते. याशिवाय, मनीष पांडेची (44 चेंडूत 61) त्याला उत्तम साथ लाभली होती.
केन विल्यम्सन आजच्या लढतीत देखील खेळू शकणार नाही, असे या संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी स्पष्ट केले आहे. मॅच फिटनेससाठी त्याला आणखी वेळ लागेल, असे बेलिस म्हणतात. यापूर्वी केकेआरविरुद्ध भुवनेश्वरची गोलंदाजी महागडी ठरली होती. तो येथे बहरात परतणे हैदराबादसाठी महत्त्वाचे असेल. रशीद खान व मोहम्मद नबी यांचा फॉर्म देखील या संघासाठी काही समीकरणे बदलणारा ठरु शकेल.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, फिन ऍलन (यष्टीरक्षक), एबी डीव्हिलियर्स, पवन देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, डॅनिएल सॅम्स, यजुवेंद्र चहल, ऍडम झाम्पा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमिसन, डॅनिएल ख्रिस्तियन, सुयश प्रभुदेसाई, के. एस. भरत.
सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), प्रियम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, विराट सिंग, मिशेल मार्श, जेसॉन होल्डर, मोहम्मद नबी, रशीद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी, जगदीश सुचित, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.









