प्राण्यांमध्येही कोरोनाचा फैलाव – प्राणिसंग्रहालयातील प्रकार
वृत्तसंस्था / हैदराबाद
देशात बहुधा पहिल्यांदाच हैदराबादच्या नेहरू जूलॉजिकल पार्कमध्ये (एनझेडपी) 8 आशियाई सिंह कोरानाबाधित आढळून आले आहेत. सेंटर फॉर सेल्युलर मॉलेक्युलर बायोलॉजीने (सीसीएमबी) प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱयांना आरटी-पीसीआर चाचणीत 8 सिंह कोरोनाबाधित आढळून आल्याचे कळविले आहे.
प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉक्टर सिद्धानंद कुकरेती यांनी याची पुष्टी देणे टाळले आहे. सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत हे सत्य आहे. पण अद्याप सीसीएमबीकडून आरटी-पीसीआर अहवाल मिळालेला नाही. अहवाल हाती आल्यावर यासंबंधी माहिती देऊ शकू असे कुकरेती यांनी म्हटले आहे.
मागील वर्षी न्यूयॉर्कमधील एका प्राणिसंग्रहालयातील 8 वाघ आणि सिंह कोरोनाबाधित आढळून आले होते. याव्यतिरिक्त प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमणावरून कुठलीच घटना समोर आलेली नाही. पण हाँगकाँगमध्ये श्वान आणि मांजरांमध्ये कोरोना विषाणू सापडला होता अशी माहिती वाइल्डलाइफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉक्टर शिरीष उपाध्ये यांनी दिली आहे.
प्राणिसंग्रहालयात एकूण 12 सिंह
24 एप्रिल रोजी पशूचिकित्सकांना या प्राण्यांची देखभाल करताना त्यांच्यात कोरोनाची लक्षणे म्हणजेच भूक न लागणे, नाकातून पाणी गळणे आणि कफची समस्या दिसून आली होती. या प्राणिसंग्रहालयात 12 सिंह असून त्यांचे सरासरी वय सुमारे 10 वर्षे आहे. प्राणिसंग्रहालयाच्या सफारी क्षेत्राचे क्षेत्रफळ सुमारे 40 एकर आहे. 4 सिंह आणि 4 सिंहिणी कोरोनाबाधित आढळल्या आहेत.
प्राणिसंग्रहालय दोन दिवसांसाठी बंद
या घटनेनंतर नेहरू जूलॉजिकल पार्क सर्वसामान्य लोकांसाठी दोन दिवस बंद करण्यात आले आहे. हे प्राणिसंग्रहालय घनदाट लोकवस्तीदरम्यान आहे. कोरोनाचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने आसपास राहत असलेल्या लोकांच्या संपर्कात आल्याने या सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचे मानले जात आहे. तसेच या सिंहांची देखभाल करणाऱया कर्मचाऱयांच्या माध्यमातून त्यांना संक्रमण झाले असण्याचीही शक्यता आहे. प्राणिसंग्रहालयात काम करणाऱया 25 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली होती.









