तेलंगणा राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा, पीव्ही सिंधूसह दिग्गज खेळाडू सराव सुरु करणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे दि. 1 जुलैपासून हैदराबाद येथे सराव शिबिर आयोजित केले गेले असून वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूसह काही दिग्गज खेळाडू त्यात सहभागी होणार आहेत. अर्थात, या प्रशिक्षण शिबिरासाठी बॅडमिंटन संघटनेला अद्याप तेलंगणा राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.
सध्याच्या घडीला काही भारतीय खेळाडू बेंगळूरमधील प्रकाश पदुकोण अकादमीमध्ये सरावही करत आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) मागील महिन्याच्या उत्तरार्धात काही नियम शिथिल केल्यानंतर बेंगळुरात या खेळाडूंना ही मुभा मिळाली. हैदराबादमध्ये मात्र अद्याप तेथील अव्वल खेळाडूंना अशी संधी मिळालेली नाही.
हैदराबादमध्ये कोव्हिड-19 चे रुग्ण सातत्याने वाढत राहिले असून यामुळे अतिदक्षतेच्या दृष्टिकोनातून 30 जूनपर्यंत तेथील लॉकडाऊन वाढवले गेले. अर्थातच, यामुळे तेथील क्रीडापटूंच्या सरावाला देखील आणखी एकदा खो बसला. त्या पार्श्वभूमीवर बॅडमिंटन संघटनेने सराव शिबिरासाठी आता पुढाकार घेतला आहे.
यापूर्वी, मार्चमध्ये भारतीय बॅडमिंटन संघटनेने लखनौत आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिप लांबणीवर टाकली होती. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार ही स्पर्धा दि. 27 एप्रिल ते 3 मे या कालावधीत होणे अपेक्षित होते. कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर स्थानिक हंगामातील बॅडमिंटन स्पर्धा किमान सप्टेंबरपर्यंत घेता येणार नाहीत, यावर या शिखर संघटनेने देखील शिक्कामोर्तब केले आहे.
‘भारतीय बॅडमिंटन संघटनेने स्थानिक स्पर्धा सुरु करण्याकरिता सर्व राज्यातील सचिवांशी चर्चा केली असून त्यानंतरच सप्टेंबरपर्यंत यातील कोणतीही स्पर्धा घेता येणार नाही, हा निर्णय घेतला आहे’, असे संघटनेचे सचिव सिंघानिया यांनी स्पष्ट केले. कोव्हिड-19 ची स्थिती सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा तपासली जाईल आणि त्या परिस्थितीनुरुप निर्णय घेतला जाईल, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.
दोन स्पर्धा यापूर्वीच रद्द
या वर्षात भारतात चार स्थानिक बॅडमिंटन स्पर्धा होणे अपेक्षित होते. त्यापैकी दोन स्पर्धा यापूर्वीच रद्द कराव्या लागल्या आहेत. हैदराबाद ओपन सुपर 100 (दि. 11 ते 16 ऑगस्ट) व पुण्यातील भारत कनिष्ठ आंतरराष्ट्रीय ग्रँडप्रिक्स (दि. 4 ते 9 ऑगस्ट) या स्पर्धा रद्द झाल्या आहेत तर मार्चमधील इंडिया ओपन सुपर 500 ही स्पर्धा लांबणीवर टाकली गेली आहे. ही स्पर्धा सुधारित बॅडमिंटन कॅलेंडरनुसार दि. 8 ते 13 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा 1 सप्टेंबरपासून
आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्चमधील ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपनंतर सर्व इव्हेंट ठप्प झाले आहेत. मागील महिन्यात भारतीय बॅडमिंटन संघटनेने 2020 चे नवे स्पर्धा कॅलेंडर जाहीर केले. त्यानुसार, वर्ल्ड टूर स्पर्धा दि. 1 सप्टेंबरपासून सुरु होईल. तैपेई ओपन ही त्यातील पहिली स्पर्धा असणार आहे. भारतात आतापर्यंत 5 लाख जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
कोटस्
‘कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे खेळाडूंचा सराव अक्षरशः ठप्प झाला आहे. पण, यापेक्षा आणखी कालावधीकरिता ते खेळापासून दूर राहणे नुकसानीचे ठरु शकते. ही बाब नजरेसमोर ठेवत आम्ही दि. 1 जुलैपासून हैदराबादमध्ये सराव शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आम्ही यासाठी राज्य सरकारची संमती, मान्यता घेत आहोत’.
-भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव अजय सिंघानिया
बॉक्स
भारतीय बॅडमिंटन संघटनेची ती महत्त्वाकांक्षी स्पर्धाही लांबणीवर
फेब्रुवारीत भारतीय बॅडमिंटन संघटनेने विविध स्तरावरील स्थानिक स्पर्धेची रुपरेषा जाहीर केली, यात साधारणपणे 2 कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. वरिष्ठ मानांकन स्पर्धेची जागा या स्पर्धेला दिली जाणार आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तीन स्तरावर ही स्पर्धा होणे अपेक्षित होते. पण, याचवेळी कोव्हिड-19 चे संकट आ वासून उभे राहिल्यानंतर भारतीय बॅडमिंटन संघटनेचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम अर्थातच लांबणीवर टाकला गेला आहे.









