क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघाचा 5-0 गोलांनी दारूण पराभव करून हैदराबाद एफसीने आयएसल फुटबॉल स्पर्धेतील आपले पहिले स्थान आणखी मजबूत केले. फातोर्डाच्या नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात मध्यंतराला हैदराबाद एफसी संघाने नॉर्थईस्ट युनायटेडवर 2-0 अशी आघाडी घेतली होती.
हैदराबाद एफसीसाठी त्यांचा स्टार स्ट्रायकर बार्थोलॉमियाँव ओग्बेचेने दोन तर आकाश मिश्रा, निखिल पुजारी आणि एदू गार्सिया यांनी प्रत्येकी एक गोल केला. या सामन्यात दोन गोल केलेला हैदराबाद एफसीचा नायजेरियन स्ट्रायकर बार्थोलॉमियाँव ओग्बेचे हा आता आयएसएलमध्ये सर्वाधिक गोल केलेला खेळाडू बनला आहे. त्याने एफसी गोवाचा फॅर्रान कोरोमिनास आणि बेंगलोर एफसीच्या सुनील छेत्री यांचा प्रत्येकी 48 गोलांचा विक्रम मोडित काढला. बार्थोलॉमियाँव ओग्बेचेच्या नावावर आता 49 गोलांची नोंद झाली आहे.
या विजयाने हैदराबा एफसी संघाला 3 गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 14 सामन्यांतून 7 विजय, 5 बरोबरी व 2 पराभवाने 26 गुण झाले असून त्यांचे अग्रस्थान कायम आहे. 22 गुणानी जमशेदपूर एफसी दुसऱया तर प्रत्येकी 20 गुणानी केरळ ब्लास्टर्स व बेंगलोर एफसी आता अनुक्रमे तिसऱया व चौथ्या स्थानावर आहेत.
सामन्याची सुरूवात धडाकेबाज पद्धतीने करताना हैदराबाद एफसीने लढतीच्या तिसऱयाच मिनिटाला गोल केला. यावेळी जॉएल चियानीसच्या शॉर्ट कॉर्नरवर बार्थोलॉमियाँव ओग्बेचेने प्रतिस्पर्धी गोलरक्षक सुभाषिश रॉयला भेदले व चेंडू जाळीत टोलविला. मध्यंतराच्या ठोक्याला हैदराबाद एफसीने दुसरा गाल करून आपली आघाडी वाढविली. जॉयल चियानीसच्या पासवर आकाश मिश्राने हा गोल केला. दुसऱया सत्रात 60व्या मिनिटाला बार्थोलॉमियाँव ओग्बेचेने आपली विक्रमी गोल केला. या गोलनंतर हैदराबाद एफसीने आपली आक्रमणे अधिक धारदार केली आणि आणखी दोन गोल नोंदविले. प्रथम 84व्या मिनिटाला साहिल तावारोच्या पासवर निखिल पुजारीने हैदराबाद एफसीच्या चौथ्या गोलाची नोंद केल्यानंतर सामना संपण्यास दोन मिनिटांचा अवधी असताना एदू गार्सियाने झेवियर सिव्हेरियोच्या पासवर सुभाषिश रॉयला वेगळय़ा कोंडीत पकडून हैदराबाद एफसीचा पाचवा गोल केला.









