हे लंबोदरा, आज तुझे सर्वांच्या घरात आगमन होत आहे. हे गजानना आजवर तुझी कृपा आम्हा सर्व बालकांवर झालेली आहे आणि यावषी हे असे कोणते संकट आलेले आहे ज्यामुळे उत्साह आहे पण त्याचबरोबर भीतीदेखील आहे. ज्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धतीने प्रचंड उत्साहाने गणेश चतुर्थी उत्सव मोठय़ा थाटामाटात साजरा करू शकत नाही. हे लंबकर्णका! तुझ्या सर्व भक्तांना शक्ती दे, बुद्धी दे आणि तुझी सेवा या सर्वांच्या हातून करून घे. हे चतुर्भुजा! तुला चार हात आहेत. माणसाकडे केवळ दोन हात आहेत. हे दोन हात विश्वाचे कल्याणही करू शकतात व विश्वाला संकटाच्या खाईतही लोटू शकतात, हे विघ्नेश्वरा! आज संपूर्ण जगाबरोबरच आपला देश कोरोनाच्या महामारीने त्रस्त झालेला आहे. भीतीयुक्त वातावरणात संकटाच्या काळय़ाकुट्ट आकाशाखाली तो स्वतःला एकटय़ाला कोंडून घेत आहे. माणूस हा सामाजिक व सुधारित प्राणी आहे, मात्र तो अलीकडे फार भरकटलेला आहे. कोरोनाच्या निमित्ताने तो स्वतःलाच घाबरू लागला आहे. या भारतवर्षावर आजवर अनेक संकटे आली. भारत कधी डगमगला नाही. मराठी माणूस नेहमीच ताठ मानेने जगत राहिला. मात्र आज कोरोनाने माणसा-माणसांमध्ये भिंती उभारल्या. माणूस एकमेकांच्या सावलीतदेखील राहण्यास तयार होत नाहीसा झाला आहे. हे वक्रतुंडा ! ही अशी परिस्थिती का उद्भवली? आम्हा भक्ताचे काही चुकले आहे का? हे गणांच्या अधिपती! तुझी रूपे अनेक, रंगही अनेक परंतु, तुझे लांब कान, मोठे उदर, तेवढेच विशाल हृदय! आणि समोर असलेली सोंड याद्वारे कोरोनाचे विषाणू तू शोषून घेऊन नष्ट कर. भारतावर पर्यायाने महाराष्ट्रावर, गोमंत भूमीवर, आलेले संकट ज्या कर्नाटकात तू जगज्जेत्या रावणालाही नामोहरम केले त्याच कर्नाटकातही कोरोनाने जनता बेहाल झालेली आहे. हे विघ्नेश्वरा! या देशावर तसेच जगावर आलेले संकट तू दूर कर. या भीतीने ग्रस्त झालेले तुझे भाविक आणि परिस्थितीचा लाभ उठवित मढय़ाच्या टाळूवरील लोणी खाणारी वाढती प्रवृत्ती यांचा नाश कर. जनतेच्या मनातील भीती दूर करण्यासाठी बा मोरेश्वरा! तू अनेक राक्षसांचा संहार केला आज संपूर्ण जगभरात माणसे गिळणारा हा कोरोना नामक राक्षस नष्ट करणे शक्मय नाही का ? हे हेरंबा! तुझी असंख्य नावे आहेत. तू केवळ अष्टविनायकच नाहीस तर तू विनायक आहेस, तुझी कीर्ती अखंड विश्वात आहे, हे सुमुखा! माणसांकडून अनेक चुका झालेल्या आहेत परंतु, या भक्तांना जर तू माफ करणार नसशील तर कोणाला माफ करणार! हे गजवदना! तुझे आम्ही सदोदित चिंतन करीत असतो. नेहमीच तुला अग्रस्थानी मान देतो तुझ्या प्रार्थनेशिवाय, तुझा उल्लेख केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा प्रारंभदेखील करीत नसतो, संत श्रे÷ ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या आणि ’देवा तूचि गणेशु, सकल मती प्रकाशु’ असे तुझे वर्णन केलेले आहे सकल जनांची आज मती बिघडलेली आहे. भारतीय संस्कृती परंपरेपासून नवी पिढी दूर होत चालली आहे. त्यांना सुबुद्धी दे. त्यांच्या डोक्मयात लख्ख प्रकाश टाक. हे देवाधिदेवा! सकळ संकटांचा नाश कर, सर्वांना सद्बुद्धी दे. येथे राजकीय पातळीवर होत असलेल्या नाटकातून सर्वसामान्य नागरिक फसला जात आहे, जनहिता विरोधात जी काही असली नाटके होत असतात त्यात तू विघ्न आण. कोरोनाच्या निमित्ताने जनतेची फसवणूक करणाऱया मग तो राजकारणी असो, वैद्यकीय उपचार करणारा असो वा पोलीस यंत्रणा असो, प्रशासकीय यंत्रणा असो, जो कोणी जनतेशी अप्रामाणिक राहील अशाना तू सरळ मार्गावर आण, हे गजकर्णका !तुझे कान मोठे आहेत तुझी नजर तीक्ष्ण आहे. या देशावर, या भारतमातेवर वक्रदृष्टी करून असलेल्या पाक आणि चीन या देशांना तू कायमची अद्दल घडव. त्यासाठी या देशात काही मंडळी लपून बसलेली आहेत ती या देशाचे खऱया अर्थाने शत्रू आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यात विघ्ने उभी कर. तूच आमचा तारक आहेस. आमच्या देशावर वक्रदृष्टी करून पहात असलेल्या शत्रूंचा संहार करण्याची ताकद आमच्या मंदिरात उभी कर. हे विघ्नराजेंद्रा, या देशातून कोरोनाचे उच्चाटन कर. कदाचित हे महागणपती तुझ्या नावाने सार्वजनिक अकरा दिवस जो काही गोंधळ घातला जातो, बाजार मांडला जातो, पैशांची उधळपट्टी केली जाते तुझ्या नावाने प्रचंड भ्रष्टाचार केला जातो त्यामुळेच कदाचित हे संकट तू दूर केलेले नाहीस परंतु हे धुम्रवर्णा आम्हाला खात्री आहे की तू ही संकटांची मालिका भारतावर जास्त काळ चालवायला देणार नाहीस. संकटाच्या वेळी धावणारा जसा भगवान श्रीकृष्ण तसाच देवदेवतांवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी भगवान विष्णूंनी तुझीच नियुक्ती केली. त्यापासून आजवर कोणत्याही धर्मकार्याच्या वेळी हे शिवसुता तुझाच मान पहिला. आज जगावर करुणा महामारीने आलेले संकट दूर करण्यासाठी हे विघ्नेश्वरा, तूच पुढाकार घे व या देशाचा पहिला मान राहु दे. आज घरोघरी तुझे आगमन होते. निष्पाप बालगोपाळ मंडळी तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. घरातील महिला वर्ग गोड करण्यासाठी राबत आहेत. घरातील कर्ता सवरता तुझ्या स्वागतासाठी सर्व तयारी करीत आहे. मात्र कोरोनाचे हे संकट आपल्यावर कधी येईल हे सांगता येत नाही या भीतीने त्यांची गाळण उडाली आहे. आजचा तुझा दिवस म्हणजे मंगलमय दिन. हे भालचंद्रा, आम्हा तमाम भक्तांच्या भाळी काय लिहिले आहे माहीत नाही परंतु या मातीतून पटापट मरत असलेल्या असंख्य निष्पाप जनतेचा बळी जात आहे, अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. हा सारा प्रकार असह्य होत आहे. आज तुझा चतुर्थीचा उत्सव म्हणजे तमाम पामरांसाठी आनंदाचा व पर्वणीचा दिवस, हे एकदंता! तूच सकल जनांचा तारक, तूच विघ्नहर्ता आहेस. या जगावरील व या देशावरील संकट दूर कर. तुझे भक्त आज चतुर्थी उत्सव साजरा करतानाच देवा तुझ्याकडे एकच साकडे तू बुद्धि देवता आहेस, या बुद्धीचा वर्षाव आमच्या राजकीय नेत्यांवरही कर. शिवाय कोरोनावर जालीम अशी उपाययोजना करण्यासाठी वैज्ञानिक मंडळी संशोधन करण्यात व लस तयार करण्यासाठी तूच देवा मदत कर, हे पार्वतीनंदना! यावषी प्रचंड पाऊस पाणी दिलेस, आता आलेल्या महापुरातून हा कोरोना वाहून जगातून नष्ट होऊन जाऊद्या आणि गणेश चतुर्थीनिमित्त देवा ! तूच संकटनाशक आहेस हे पुन्हा एकदा सिद्ध कर, एवढीच प्रार्थना.
Previous Articleरूप गणेशाचे….देई बीज संस्काराचे…..
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








