पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांचा प्रश्न : धूमस्टाईल ही जणू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बनली ओळख
प्रतिनिधी /बेळगाव
धूमस्टाईल ही जणू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ओळख बनली आहे. त्याला पालकांचे प्रोत्साहन असणे हे दुदैवीच. पण कायदा सगळय़ांनाच सरळ करतो. याची प्रचिती तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आली. तथापि कायद्याचे उल्लंघन करणाऱया या विद्यार्थ्यांत हे धाडस येते तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित डझनभर पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांना पडला.
लिंगराज कॉलेजसमोर हिजाबवरून गोंधळ सुरू होता. त्यामुळे सहाजिकच प्रवेशद्वारावर पोलीस फौजफाटा होता. जवळच अर्धा डझन पोलीस अधिकारी वादावर पडदा टाकण्यासाठी हितगुज करीत होते. पण काही हौशी महाविद्यालयीन विद्यार्थी वारंवार सायलन्सरचा आवाज वाढवून त्यांच्या चर्चेत व्यत्यय आणत होते. त्याशिवाय इतके वरि÷ पोलीस अधिकारी असतानाही त्यांच्या समोरूनच विद्यार्थी विनाहेल्मेट आणि ट्रिपलसीट ये-जा करीत होते.
आधीच हिजाब प्रकरणाने पोलिसांची तारांबळ उडाली असताना हे धूमस्टाईल विद्यार्थी पोलिसांना जणू वाकुळय़ा दाखवून फुर्रर्र होत होते. ही बाब एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या नजरेतून सुटली नाही. विद्यानिकेतनकडून हॉटेल पवनच्या दिशेने येणारी दुचाकी त्यांनी अचानक अडविली. चावी काढून घेत चालकाच्या कानशिलात दोन वाजविल्या. तोपर्यंत काय होतंय हे कोणालाच समजले नाही. सदर विद्यार्थी एकतर ट्रिपलसीट होते. त्यात धुमस्टाईल. मग काय? दुचाकीसह कँम्प पोलीस स्थानकात विद्यार्थ्यांची विनवणी सुरू झाली.
एकंदर विद्यार्थी सुसाट झाले आहेत. मग ते हिजाबसारख्या प्रकरणात असो वा वाहन चालविण्यात. पण त्यांच्यावरही कायदा हेच उत्तम उत्तर आहे. हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थीनींनाही हीच शिकवण मिळाली असावी, अशी चर्चा सुरू होती.









