कोरोनाग्रस्त मित्रावरील प्रेम पाहून सिपीआर परिसर निःशब्द
प्रतिनिधी / वाकरे
गणेशवाडी (ता. करवीर) येथील डी.वाय.माने यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आणि सर्वांना एका अनोख्या आणि तितक्याच जिगरी दोस्तीचे दर्शन झाले.त्यांचे मित्र वाकरेचे सरपंच वसंत तोडकर यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्या मित्रावर स्वतः पंचगंगा स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार केले.हे कोल्हापूर आहे आणि येथे दोस्ती सुध्दा देवाला हेवा वाटावा इतक्या ताकदीने निभावतात याचा प्रत्यय आला.
डी.वाय.माने,बुद्धीराज पाटील,वसंत तोडकर ,शिवाजी तळेकर व इतर मंडळी पंचक्रोशीत आमदार पी.एन.पाटील यांचे प्रमुख कार्यकर्ते म्हणुन ओळखले जातात.गेल्या विधानसभा निवडणुकीत माने आणि तोडकर यांच्यात मैत्रीचे नाते जुळले आणि ते दृढ झाले.दिवसभरात अनेकदा या दोघांचा फोनवर संपर्क असायचा.अशा या कार्यकर्त्यांमधील माने यांना कोरोनाची लागण झाली आणि मित्रांच्या छातीत धस झाले.मित्र वाचला पाहिजे यासाठी मित्रांनी जीव पणास लावला. गेल्या आठ दहा दिवसात सीपीआर रुग्णालयाचा परिसर या अनोख्या मैत्रीचे नाते अनुभवत होता.या कालावधीत स्वतःच्या तब्येतीची तमा न बाळगता वाकरे गावचे सरपंच वसंत तोडकर सकाळी सात वाजता दवाखान्यात नाष्टा घेऊन यायचे आणि रात्री दहापर्यंत दवाखान्याच्या आवारातच थांबायचे,त्यांना फक्त मित्राच्या तब्येतीचा ध्यास होता.सिपीआरच्या डाॅक्टर्सनी त्यांचे मित्रावरील प्रेम पाहून डी.वाय.ना कोणत्याही परिस्थितीत बरे करायचे हे ठरवले.आमदार पी. एन.पाटील यांनी फोन करून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सना माने यांच्यावर योग्य डॉक्टर्सना माने यांच्यावर योग्य उपचार करण्यास सांगितले.
डॉ.सैबना वाढ यांनी उपचारांची शिकस्त केली.नातेवाईक दवाखान्यात धावपळ करीत होते.डाॅक्टर्सनी वसंत तोडकरांना घरी जाण्याचा सल्ला दिला,कारण कोविड हॉस्पिटल परिसरात थांबणे म्हणजे रोगाला आमंत्रण देणेच होते.अनेकांनी सल्ले दिले,पण वसंत मागे हटले नाहीत. मित्राला सुखरुप घरी न्यायचे हाच त्यांचा हट्ट होता.हट्टाला पेटलेला गडी कसा असावा हे हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी पाहिले.
पण काळाला ही मैत्री सहन झाली नाही,अखेर मंगळवारी डी.वाय.माने यांचा मृत्यू झाला.मित्राला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले.रितसर पुढील सोपस्कार पार पाडणे आवश्यक होते.आरोग्य खात्याच्या नियमानुसार स्वतंत्र दहन करणे आवश्यक होते.पण तिथे ‘वसंत’चे मित्रप्रेम उफाळून आले.”माझ्या मित्राचे अंत्यसंस्कार कोणी अनोळखी व्यक्तीने केलेले मला चालणार नाही” असे सांगून त्यांनी बाजारातून पीपीई किट घेतले आणि मित्रावर स्वतः कर्मचाऱ्यांना साथीने पंचगंगा स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार केले.
रोज अनेक मृत्यू आणि सग्या सोयऱ्यांकडे पाठ फिरवणारी समाजातील वृत्ती आणि बोथट झालेली माणुसकी बघणारा सीपीआर परिसर या मैत्रीचे नाते पाहून कांही काळ निःशब्द झाला.लॉक डाउन झाल्यापासून सरपंच तोडकर गाव सॅनिटाईज,स्वच्छता ठेवणे,कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अहोरात्र झटत आहेत.खासदार संभाजीराजे छत्रपती,खासदार संजय मंडलिक,आमदार पी.एन.पाटील,माजी आमदार चंद्रदीप नरके, कुंभीचे संचालक संजय पाटील,गोकुळ संचालक उदय पाटील,केडीसी संचालिका उदयानी साळुंखे, सभापती अश्विनी धोत्रे यांनी त्यांचे कौतुक करून काळजी घेण्यास सांगितले.
Previous Articleसातारा जिल्ह्यात आज 753 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज
Next Article कोल्हापूर महापलिकेची वर्षाखेरीस निवडणूक ?









