वंटमुरी कॉलनीजवळ अबकारी विभागाची कारवाई,16 ग्रॅम हेरॉईन जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये अमलीपदार्थांची विक्री जोरात सुरू आहे. येथील अबकारी अधिकाऱयांनी हेरॉईन विकणाऱया एका जोडगोळीला अटक करुन त्यांच्या जवळून 16 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे.
येथील वंटमुरी कॉलनीजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. अबकारी निरीक्षक दुंडाप्पा हक्की व त्यांच्या सहकाऱयांनी या जोडगोळीला अटक केली असून रात्रीच्यावेळी हेरॉईन विक्री करताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
अब्दुलखादीर अतिक नायक उर्फ जीया (वय 25), अकीब सलीम मकानदार (वय 24, दोघेही रा. महांतेशनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या जवळून अधिकाऱयांनी एक इनोव्हा कारही जप्त केली आहे. कारमध्ये बसून हेरॉईनची विक्री करण्यात येत होती.
अबकारी अप्पर आयुक्त व अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अब्दुलखादीर व अकिब यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. या जोडगोळीने हेरॉईन कोठून आणले, याची चौकशी करण्यात येत आहे.
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मोठय़ा प्रमाणात एमडी नामक अमलीपदार्थ जप्त केले आहेत. ऍड. राजकुमार राजहंस याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे बेळगावपर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू असतानाच अबकारी अधिकाऱयांनी हेरॉईन विकणाऱया जोडगोळीला अटक केली आहे. बेळगाव परिसरात केवळ गांजाच नव्हे तर हाशिष, हेरॉईन, मरिजुवाना, पन्नी आदी अमलीपदार्थांची विक्री होते. मध्यंतरी बेळगाव पोलिसांनी पन्नीविरुद्ध मोहीम उघडली होती.