स्पायवेयर कंपनीचा मालक बदलणार : सायबर डिफेन्ससाठी केवळ वापर
वृत्तसंस्था/ तेल अवीव
भारतासह जगभरातील विविध देशांमध्ये हेरगिरीच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले पेगॅसस सॉफ्टवेअर तयार करणारी इस्रायलची कंपनी एनएसओ ग्रूप लिमिटेड कर्जांमध्ये बुडालेली असून दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे. आर्थिक संकट पाहता कंपनी पेगॅसस सॉफ्टवेअर बंद करणे आणि ते विकण्याची तयारी करतेय.
कंपनीने अनेक इन्व्हेस्टमेंट फंडसोबत बोलणी केली असून यात आर्थिक मदत अणि कंपनी पूर्णपणे विकण्यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे. कंपनीने मोइलिस अँड कंपनीकडून सल्लागार मिळविले आहेत.
कंपनी खरेदीदारांसाठी दोन नावे सर्वात आघाडीवर आहेत. दोन्ही अमेरिकन फंड असून या व्यवहारावर शिक्कामोर्तब झाल्यास दोन्ही कंपन्या सुमारे 1500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर करून मजबूत सायबर सुरक्षा तयार करू शकतील. याचबरोबर इस्रायली कंपनीचे ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यातही या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो.
भारत सरकारने 2017-2019 दरम्यान सुमारे 300 भारतीयांवर या सॉफ्टवेअरद्वारे पाळत ठेवल्याचा आरोप एका वृत्तपोर्टलने जुलै महिन्यात केला होता. पाळत ठेवलेल्या लोकांमध्ये पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षांचे नेते नेते आणि उद्योजक सामील होते असा दावा करण्यात आला होता. परंतु सरकारने सर्व आरोप फेटाळून लावले होते.
ऍपलची न्यायालयात धाव
टेक कंपनी ऍपलने मागील महिन्यात एनएसओच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 1 अब्जाहून अधिक आयफोन्सना पेगॅससद्वारे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप ऍपलने केला आहे. जगभरात 1.65 अब्ज ऍपल डिव्हायसेसस असून यातील 1 अब्जाहून अधिक आयफोन्स असल्याने लोकांचे खासगीत्व धोक्यात येऊ शकते असे ऍपलचे म्हणणे आहे.