सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर-हेम्माडगा-अनमोड राज्य मार्गापैकी हेम्माडगा ते खानापूर तालुका हद्दीपर्यंतचा 4 कि. मी. रस्ता अत्यंत खराब झाला असून त्याचा तातडीने विकास करावा, अशी मागणी करणारे निवेदन माजी जि. पं. सदस्य बाबुराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक कार्यकारी अभियंता बसवराज हलगी यांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर, हेम्माडगा, अनमोड हा रस्ता हेम्माडगा-सिंदनूर राज्यमार्गात मोडतो. या रस्त्यापैकी हेम्माडगा ते खानापूर तालुका हद्दीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून त्यावर खाच, खळगे पडले आहेत. यामुळे त्या रस्त्यावरुन वाहने चालवणेदेखील अत्यंत अवघड झाले आहे. त्यातच अनमोड-रामनगर रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरुन गोव्याहून बेळगावकडे जाणारी वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. यामुळे तर रस्त्यावरील डांबराचे अवशेष पूर्णपणे गायब झाले आहे.
रस्त्याचे काम त्वरित हाती न घेतल्यास आंदोलना
गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली खानापूöअनमोड व्हाया हेम्माडगा तसेच खानापूर-पाली बससेवाही त्वरित सुरू होणार आहे. पण 4 कि. मी. चा रस्ता पूर्णतः खराब झाल्याने बस सुरू होणेदेखील कठीण आहे. आता दि. 15 जुलैपासून शाळा-कॉलेज सुरू होणार असल्याने या भागातील मुलांना शाळा-कॉलेजला जाण्यासाठी बसचीही अत्यंत गरज आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करुन ‘त्या’ 4 कि. मी. रस्त्याच्या विकासाचे काम त्वरित हाती घ्यावे, अन्यथा यासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल. असा इशाराही त्या निवेदनात देण्यात आला
आहे.
तात्पुरत्या दुरुस्तीचे आश्वासन
निवेदनाचा स्वीकार करुन बसवराज हलगी म्हणाले, या रस्त्याच्या संपूर्ण विकासासाठी 4 कोटी रु. चा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्याची मंजुरी मिळताच रस्त्याच्या विकासाचे काम त्वरित हाती घेतले जाईल. याला आणखी काही महिन्याचा कालावधी लागणार आहे. पण त्या आदी रस्ता खराब झाल्याने होणारी वाहतुकीची अडचण दूर करण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवून त्याची दुरुस्ती करुन देऊ, असे आश्वासन साहाय्यक कार्यकारी अभियंता बसवराज हलगी यांनी दिले.
या शिष्टमंडळात शिरोली ग्रा. पं. च्या अध्यक्षा लक्ष्मी पाटील, ग्रा. पं. सदस्य महादेव शिवोलकर, नारायण काटगाळकर, हरीभाऊ गोरल, शिवाजी पाटील, पिंटू शिवोलकर यांचा समावेश होता.









