तरुण भारत संवाद
जगन्नाथ हुक्केरी/सोलापूर
हॅलो, पंकजाताई… असा फोन दिवसातून 20-25 वेळा संतोषभाऊंना येत आहेत. याचे कारण वेगळेच आहे. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्या असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म या साईटवरील नॅशनल इलेक्शन वॉचच्या वेबसाईटवर चक्क राष्ट्रवादीचे शहर-जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार यांचा मोबाईल क्रमांक टाकण्यात आला आहे. यामुळे बीडसह राज्यभरातील फोन त्यांच्याच फोनवर खणखणू लागले आहेत.
याबाबत संतोष पवार यांनी मुंढे यांनाही कल्पना दिली आहे. तरीही हा नंबर हटविण्यात आला नाही. भाजपच्या नेत्याच्या नावे राष्ट्रवादीच्या नेत्याला फोन येत असल्याने कार्यकर्ते चकित झाले आहेत. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांची इत्यंभूत माहिती असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या ‘मायनेता डॉट इन्फो’ या साईटवर आहे. यात संतोष पवार यांचा 99210511115 असा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. यात वास्तविक 10 आकडे असणे अपेक्षित असताना त्यात 11 आकडे आहेत. शेवटचा पाच हा आकडा जास्त असल्याने नागरिक मदतीसाठी 9921051111 या राष्ट्रवादीचे शहर-जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या मोबाईवर फोन करीत आहेत. येणारे फोन ते स्वतः घेऊन संबंधित व्यक्तीला नम्रपणे हा माझा वैयक्तिक नंबर असून, माझा आणि पंकजाताई मुंढे यांच्या वेबसाईटशी काहीही संबंध नसल्याचे सांगत आहेत. शिवाय पंकजा मुंढे यांचे स्वीय सहाय्यक व मुंढे यांचा मोबाईल क्रमांक व मुंबई, बीड येथील कार्यालयाचे नंबर सांगत आहेत. पंकजा मुंढे या संतोष पवार यांच्या विरोधी पक्षात असल्या तरी गरजवंतांची अडवणूक होऊ नये व समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये, या भावनेतून ते मदतीचा पुढील मार्ग दाखविण्याबरोबरच पंकजा मुंढे यांचा संपर्क क्रमांकही सांगत आहेत.
त्रास नाही… उलट मदतच
संतोष पवार यांना ड्राईव्हिंगची आवड असून, ते चालक असतानाही बहुतांशवेळा स्वतःच गाडी चालवितात. गाडी चालवत असतानाही फोन आले, तर ते तितकेच नम्रपणे समोरच्या व्यक्तीला मदत करीत आहेत. याचा त्रास होत असला तरीही ते समोरच्या व्यक्तीला मदतच करीत आहेत. याबाबत त्यांनी पंकजा मुंढे यांचे स्वीय सहाय्यकांना फोन करुन हा नंबर बदलण्याचा सल्ला दिला आहे. या गोष्टीला महिना होऊन गेला तरीही हा नंबर हटविण्यात आला नाही. याची कल्पना त्यांनी पंकजा मुंढे यांच्या कार्यकर्त्यांबरोबरच पूर्वी बीडमध्ये पत्रकारिता केलेले वक्ते दत्ता थोरे यांच्याकडूनही पंकजा मुंढे यांना दिली आहे.









