पॅरीस : रूमानियाची द्वितीय मानांकित महिला टेनिसपटू सिमोना हॅलेप ऑगस्ट महिन्यात होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील प्राग क्ले कोर्ट महिलांच्या टेनिस स्पर्धेत सहभागी होणार आहे पण आगामी अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत आपल्या सहभागाविषयी हॅलेपने साशंकता व्यक्त केली आहे.
प्रागमधील महिलांची टेनिस स्पर्धा 10 ते 16 ऑगस्ट दरम्यान घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱया पालेर्मो क्ले कोर्ट टेनिस स्पर्धेत हॅलेप सहभागी होणार असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. गेल्या मार्चनंतर हॅलेप डब्ल्यूटीए टूरवरील व्यावसायिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होत आहे. 2018 साली हॅलेपने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. हॅलेप आता 27 सप्टेंबरपासून पॅरीसमध्ये होणाऱया प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेवर लक्ष अधिक केंद्रीत करणार असल्याने 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत ती निश्चित सहभागी होईल, याची साशंकता आहे.









