वृत्तसंस्था/ मेलबर्न
रूमानियाच्या द्वितीय मानांकित सिमोना हॅलेपने रविवारी येथे एटीपी टूरवरील मेलबर्न समरसेट महिलांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून आता ती ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. डब्ल्यूटीए टूरवरील हॅलेपचे हे एकेरीतील 23 वे विजेतेपद आहे. डब्ल्यूटीए टूरवरील मेलबर्न समर सेट 2 टेनिस स्पर्धेमध्ये अमेरिकेच्या ऍनीसिमोव्हाने अजिंक्यपद पटकाविले.
रूमानियाच्या हॅलेपने अंतिम सामन्यात तृतीय मानांकित कुड्रेमेटोव्हाचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. तब्बल 15 महिन्यांच्या कालावधीनंतर हॅलेपचे हे पहिले जेतेपद आहे. या स्पर्धेत तिने पहिल्यांदाच विजेतेपद पटकाविले आहे.
मेलबर्न समरसेट 2 महिलांच्या टेनिस स्पर्धेत रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या अमांदा ऍनीसिमोव्हाने बेलारूसच्या सेसनोव्हिचचा 7-5, 1-6, 6-4 असा पराभव करत विजेतेपद हस्तगत केले. ऍनीसिमोव्हाला जेतेपदासाठी तब्बल दोन तास झगडावे लागले. डब्ल्यूटीए टूरवरील ऍनीसिमोव्हाचे हे तिसरे विजेतेपद आहे.









