टी-20 विश्वचषक – ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखून नमवले
दुबई / वृत्तसंस्था
जोस बटलरने अवघ्या 32 चेंडूत नाबाद 71 धावांची आतषबाजी केल्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा तब्बल 8 गडी राखून एकतर्फी धुव्वा उडवला आणि आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीसमीप झेप घेतली. वनडे वर्ल्ड चॅम्पियन्स असलेल्या इंग्लंडने प्रारंभी ऑस्ट्रेलियाला 20 षटकात सर्वबाद 125 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखले व प्रत्युत्तरात 11.4 षटकात 2 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 126 धावांचे किरकोळ आव्हान असताना बटलर व जेसॉन रॉय (22) यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चौफेर धुलाई करत पॉवर प्लेच्या 6 षटकात 66 धावांची आतषबाजी केली. पॉवर प्लेमध्ये या स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या देखील ठरली.
बटलरने 5 चौकार व तितकेच षटकार फटकावताना स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतकही नोंदवले. त्याने 25 चेंडूतच अर्धशतकाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाने रॉय व मलान यांचे बळी घेतले. मात्र, बेअरस्टो व बटलर यांनी एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. इंग्लंडसाठी हा सलग तिसरा विजय तर ऑस्ट्रेलियाचा 2 विजयानंतर पहिला पराभव ठरला.
तत्पूर्वी, ख्रिस वोक्स (2-23) व ख्रिस जॉर्डन (3-17) यांनी डेव्हिड वॉर्नर (1), स्टीव्ह स्मिथ (1), ग्लेन मॅक्सवेल (6) यांना पहिल्या 4 षटकातच बाद करत कांगारुंना जोरदार धक्के दिले. केवळ ऍरॉन फिंचच्या 49 चेंडूतील 44 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला सव्वाशे धावांची मजल गाठता आली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः 20 षटकात सर्वबाद 125 (ऍरॉन फिंच 49 चेंडूत 4 चौकारांसह 44, ऍस्टॉन ऍगर 20 चेंडूत 2 षटकारांसह 20, पॅट कमिन्स 3 चेंडूत 2 षटकारांसह 12. ख्रिस जॉर्डन 3-17, ख्रिस वोक्स 2-23, मिल्स 2-45, अदिल रशिद, लियाम लिव्हिंगस्टोन प्रत्येकी 1 बळी).
इंग्लंड ः 11.4 षटकात 2 बाद 126 (जोस बटलर 32 चेंडूत 5 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 71, जेसॉन रॉय 20 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 22, जॉनी बेअरस्टो 11 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 16. ऍस्टॉन ऍगर, ऍडम झाम्पा प्रत्येकी 1 बळी).









