इंग्लंडविरुद्ध कसोटी व टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता वनडे मालिकाविजयाचे लक्ष्य
पुणे / प्रतिनिधी
भारत आणि इंग्लंड मधील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना उद्या (रविवारी) पुण्यात रंगणार आहे. या मालिकेत भारताने कसोटी व टी-20 अशा दोन्ही मालिका जिंकल्या असून येथे आज विजय संपादन करत मालिकाविजयाची हॅट्ट्रिक साजरी करण्याचा विराटसेनेचा प्रयत्न असणार आहे. येथील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे.
पहिल्या दोन्ही सामन्याप्रमाणे तिसऱया सामन्यातही धावांचा पाऊस पडण्याची शक्मयता आहे. भारताकडून राहुल आणि कोहलीने दोन्ही सामन्यात सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे, तर रोहित दोन्ही सामन्यात स्टार्ट घेऊन बाद झाला आहे. धवनने पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली, तर दुसऱया सामन्यात त्याने केवळ 4 धावा केल्या. रोहित आणि धवनला आपल्या फलंदाजीत सातत्य ठेऊन भारताला चांगली सलामी मिळवून द्यावी लागणार आहे. अय्यरच्या जागी संधी मिळालेल्या ऋषभ पंतने धडाकेबाज अर्धशतक ठोकून आपले नाणे खणखणीत वाजविले आहे. त्यामुळे सूर्यकुमारला अजून वेटिंगवर रहावे लागणार आहे. पंडय़ा ब्रदर्सही फलंदाजीमध्ये आपले योगदान देतील.
भुवनेश्वरसोबत टी. नटराजन किंवा महंमद सिराजला तिसऱया सामन्यात संधी मिळू शकते. कुलदीपला पहिल्या दोन्ही मॅचमध्ये आपला ठसा उमटवला आला नाही. दुसऱया सामन्यात कुलदीपने आपल्या 10 षटकात तब्बल 84 धावांची लूट केली होती. दोन्ही सामन्यात त्याला एकही बळी मिळवता आला नाही. त्यामुळे कदाचित त्याच्याऐवजी यजुवेंद्र चहलला संधी मिळू शकते. दुसऱया सामन्यात भारतीय गोलंदाजांची चांगलीच पिटाई झाली होती. भारताला पाचव्या बॉलरची उणीव भासत आहे. दोन्ही सामन्यात कृणाल पंडय़ाचा पाचवा बॉलर म्हणून भारताने वापर केला, पण तो यशस्वी होताना दिसला नाही. त्यामुळे भारताला 10 षटके सक्षमपणे टाकू शकेल, अशा पाचव्या बॉलरची गरज आहे.
इंग्लंडला फलंदाजीची चिंता नाही
दुसरीकडे इंग्लंडला फलंदाजीची चिंता नाही. जॉनी बेअरस्ट्रो, जेसन रॉय यांच्यासोबत बेन स्टोक्सचे फॉर्मात येणे ही इंग्लंडसाठी जमेची बाजू आहे. त्यांच्यासोबतच बटलर, डेविड मलान, लिव्हिंगस्टोन अशी फलंदाजीची फळी आहे, तर इंग्लंडकडे करन बंधू, स्टोक्स, टॉप्ली, रशीद बॉलिंगची बाजू सांभाळतील. इंग्लंडकडला गोलंदाजीची चिंता आहे. दोन्ही सामन्यात भारताने 300 धावांच्या वर धावसंख्या रचली आहे. त्यामुळे इंग्लंडला गोलंदाजीच्या बाजूवर मेहनत घ्यावी लागणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर.
इंग्लंड ः मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर (कर्णधार), सॅम करण, टॉम करण, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, अदिल रशिद, जेसॉन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, मार्क वूड, डेव्हिड मलान. राखीव ः जेक बॉल, ख्रिस जॉर्डन.
सामन्याची वेळ- दुपारी 1.30 पासून.
थेट प्रक्षेपण- स्टार नेटवर्क
स्टोक्सचे ‘ते’ 10 फटके अन् सामन्याचा नूरच पलटला!
या मालिकेतील दुसऱया वनडे सामन्यात भारताला 336 धावांचा डोंगर रचल्यानंतरही नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला, त्यावेळी अष्टपैलू बेन स्टोक्सचा झंझावात निर्णायक ठरला. जॉनी बेअरस्टो व जेसॉन रॉय यांनी 110 धावांची सलामी दिल्यानंतर इंग्लंडने भक्कम पायाभरणी केली. मात्र, इंग्लंड पुढे 30 षटकात 1 बाद 194 अशा स्थितीत असताना हा सामना दोलायमान होता, दोन्ही संघांना विजयाची समसमान संधी होती. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या 20 षटकात षटकामागे 7.15 च्या सरासरीने 143 धावांची गरज होती. याचवेळी बेन स्टोक्सचा झंझावात येथील गहुंजे स्टेडियमवर अवतरला आणि यामुळे सामन्यातील सर्व रंगतच निघून गेली.
स्टोक्सने त्यानंतर खेळलेल्या 10 चेंडूंवर चक्क 45 धावांची आतषबाजी केली आणि यात 6 षटकार व एका चौकाराचा समावेश राहिला. या 10 चेंडूंपूर्वी स्टोक्सच्या खात्यावर 40 चेंडूत 50 धावांची नोंद होती. नंतर 10 चेंडूतील झंझावातानंतर तो 50 चेंडूत 95 धावांवर पोहोचण्यात यशस्वी ठरला. यानंतर इंग्लंडसमोर शेवटच्या 16 षटकात 4.4 च्या किरकोळ सरासरीने 71 धावांचे आव्हान होते, ते त्यांनी सहज पार केले.
अन् म्हणूनच विराटने पंडय़ाला गोलंदाजी दिली नाही!
कुलदीप यादव व कृणाल पंडय़ा हे दोन्ही फिरकीपटू भलतेच महागडे ठरत असताना हार्दिक पंडय़ाने हार्दिक पंडय़ाकडे चेंडू का सोपवला नाही, हे कोडे दुसऱया लढतीत निर्माण झाले होते. मात्र, स्वतः विराटनेच याचा खुलासा केला असून त्यानुसार, हार्दिक पंडय़ावरील वर्कलोड वाढू नये, यासाठी त्याच्याकडे गोलंदाजी सोपवली नसल्याचे त्याने म्हटले आहे.
शुक्रवारी दुसऱया वनडेत स्टोक्स व बेअरस्टो भारतीय गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडत असताना हार्दिकसारख्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवण्याची गरज होती. मात्र, असे का केले नाही, याचा खुलासा करताना विराट म्हणाला, ‘टी-20 मध्ये पंडय़ाने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर भरीव योगदान दिले. मात्र, तो तंदुरुस्त व मजबूत राहणे संघाच्या दृष्टीने आवश्यक आहे. ते पाहता, त्याच्याकडे गोलंदाजी सोपवून चालणारे नव्हते’.
जॉनी बेअरस्टोची सुनील गावसकरांवर टीका
इंग्लिश सलामीवीर जॉनी बेअरस्टोने ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांच्यावर टीका केली. गावसकर यांनी यापूर्वी बेअरस्टोने कसोटी क्रिकेट गांभीर्याने घेतले नसल्याचे म्हटले होते. त्यावर बेअरस्टोने टीका करताना पुढील वेळी माझ्यावर टीका करण्यापूर्वी मला फोन करा, मी फोनवर उपलब्ध आहे, अशा शब्दात त्यांचा समाचार घेतला. इंग्लंडला भारताविरुद्ध कसोटी मालिकेत 1-3 असा पराभव पत्करावा लागला, त्यावेळी खेळलेल्या 4 डावात बेअरस्टोने 0, 0, 0 व 28 अशी नामुष्कीजनक, अपयशी कामगिरी नोंदवली होती. बेअरस्टोच्या खात्यावर आतापर्यंत खेळलेल्या 74 कसोटी सामन्यात 34.12 च्या सरासरीने 4197 धावा आहेत. याशिवाय, 85 वनडेत त्याने 11 शतके व 48.92 च्या सरासरीसह 3425 धावांचे योगदान दिले आहे.
कोटस
भारतीय संघ वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या 40 षटकात अतिशय सावध फलंदाजीवर भर देत असल्याचे माझे निरीक्षण आहे. हीच परंपरा कायम ठेवण्याची चूक केली तर याचा त्यांना आगामी वनडे विश्वचषक स्पर्धेत फटका बसू शकतो. पाटा स्वरुपाच्या खेळपट्टीवर भारताने 375 पेक्षा अधिक धावसंख्येचे लक्ष्य समोर ठेवले पाहिजे.
-माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन









