आयजीपी ओमवीर सिंग यांचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
इंटरनेट जगतात उलथापालथ माजविणारे 99 टक्के सायबर हॅकर्स हे चीनमधून कार्यरत असतात. तेथे तपासकार्यालाही सहकार्य मिळत नसल्यामुळे लोकांनी जपून व्यवहार करावेत, असे आवाहन पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी केले आहे.
सायबर गुन्हेगारांचे मोठे आव्हान आज जगासमोर आहे. गोव्याचा सायबर विभाग कोणतीही आव्हाने स्वीकारण्यास सक्षम आहे. परंतु लोकांनी आपली फसवणूक होऊ नये याची खबरदारी घ्यावी कारण 99 टक्के सायबर गुन्हेगार हे चीनमधून गुन्हेगारी कृत्य करत असतात. त्यामुळे त्यांचा पत्ता लागला तरी तपासासाठी तेथून सहकार्य मिळत नाही, असेही ओमवीर सिंग यांनी सांगितले. लोकांनी मोबाईल ऍप डाऊनलोड करताना आणि त्याचा वापर करतानाही खबरदारी घ्यावी. बहुतेक मोबाईल गेम्स ऍप हे विदेशी असतात. मोबाईल गेम्सकडे विशेषतः मुले अधिक आकर्षित होत असतात. पालकांच्या मोबाईलवर मुले गेम्स ऍप डाऊनलोड करीत असतात अशावेळी पालकांनी लक्ष देणे फार जरुरीचे आहे. फसणूक झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यापेक्षा फसवणूक होणार नाही यासाठी खबरदारी घेणे फार महत्त्वाचे आहे, असेही पोलीस महानिरीक्षक सिंग यांनी सांगितले.