येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने मराठी भाषादिन साजरा
प्रतिनिधी / येळ्ळूर
माणसांच्या हृदयाला भिडणारे साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. अलीकडे मराठी भाषा आणि संस्कृतीवर जे अतिक्रमण होत आहे ते रोखणे काळाची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे आजच्या तरुण पिढीने मातृभाषा टिकविण्यासाठी पुढे येणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. देसाई यांनी व्यक्त केले.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवहिंद को-ऑप. सोसायटीचे माजी चेअरमन एल. आय. पाटील होते.
प्रास्ताविक मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी केले. यावेळी त्यांनी साहित्य संघाच्यावतीने आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी एल. आय. पाटील यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांना माहिती दिली. मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी साहित्य संघाचे सचिव डॉ. तानाजी पावले, कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, साहित्य संघाचे सदस्य रमेश धामणेकर, परशराम बिजगरकर, कृष्णा टक्केकर, परशराम धामणेकर, शिक्षक संजय मजुकर, विद्या पाटील, एम. बी. पंतर, एस. पी. मेलगे, महादेव घाडी, नारायण नंदिहळ्ळी यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सी. एम. गोरल यांनी सूत्रसंचालन केले. विद्या पाटील यांनी आभार मानले.









