अध्याय बारावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, वेद हे त्रिकांडात्मक व त्रिगुणात्मक आहेत. पण मी तर त्रिगुणांच्या पलीकडे असल्याने त्रिगुणात्मक वेदांच्या अभ्यासाने माझे स्वरूप कळणार नाही. वेद, शास्त्रे, विधान व विधी यांचे मूळ अविद्या म्हणजे मायाच आहे. अविद्येमुळे देहबुद्धि उत्पन्न होते. म्हणून तू अविद्या सोडून दे. मी सांगतोय ते लक्षात न घेता स्वतःचं डोकं लढवून मनुष्य ज्या कल्पना करतो ना, तीच अविद्या होय. अविद्या जाण्यासाठी सर्व प्राण्यांचा आत्मा असलेल्या एकमेव मला परमात्म्यालाच अनन्य भावाने शरण ये. मग तुला कोणत्याही प्रकारचे भय राहणार नाही. मला शरण येताना तुझी अविद्या नष्ट व्हायला हवी. मी म्हणजे हा देह आहे असा समज म्हणजेच अविद्या. ती नष्ट होण्यासाठी तुला लौकिक जीवनातल्या गोष्टींचा त्याग करावा लागेल. सर्व सोडून मला शरण ये. मी मुख्यत्वेकरून हृदयातील भाव जाणतो म्हणून मला अंतर्यामी असे म्हणतात. खरा त्यागीपणा सर्व अभिमान सोडण्यातच आहे. सर्व अभिमान सोडून मला शरण आलास की, तुझे जन्ममरण संपले म्हणून समज कारण माझ्या प्रतापानेच तू तरशील. शरण येण्यासाठी मला कुठं म्हणून हुडकायचं असं विचारतोयस तर ऐक, अरे मी तुझ्या हृदयातच आहे. जेव्हा सर्वभावाने व सर्वस्वासह मला हृदयस्थाला शरण येशील, तेव्हाच सर्व प्राणिमात्रात व हृदयात राहणाऱया माझी सर्वव्यापकता तुलाही प्राप्त होईल. तिळमात्रही अभिमान शिल्लक ठेऊन जर मला शरण येशील, तर माझी प्राप्ती व्हावयाची नाही. कारण अभिमान हेच माझ्या प्राप्ती होण्यातले विघ्न आहे. डोळय़ामध्ये गेलेला खडा विरघळत नाही, जखमेत शिरलेले भाल्याचे टोक त्यातच जिरत नाही, मोत्यामध्ये टाकी शिरत नाही किंवा खिरीत सराटा चालत नाही त्याप्रमाणे उद्धवा ! माझ्यामध्येही अभिमान शिरत नाही, हे लक्षात ठेव. ही त्यागातील तात्पर्याची खूण मी तुला पूर्णपणे सांगितली. अभिमानात गुंतून राहणाऱया भक्तांना मी स्वीकारीत नाही. याकरिता अभिमान सोडून मला हृदयस्थाला तू शरण आलास तर उद्धवा ! देवकीची शपथ, तुझा मी उद्धार करीन.
पण तू म्हणशील की, “तुला तर दोन आया आहेत, तेव्हा कोणत्या आईची शपथ खरी मानावी?’’ तर मला खरोखर मला माझीच शपथ आहे. तुला माझ्यामुळेच निर्भयता प्राप्त होईल. “पण तू शब्दात काही सापडत नाहीस आणि क्रिया म्हणून तुला काहीच नाही. तेव्हा तुझी आणभाक तरी खरी मानावी काय ?’’ अशी जर मनामध्ये कल्पना आणशील आणि “तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून असलेला स्वधर्म सोडून द्यावा व तुझी शपथ खोटी ठरली तर मग तुझ्यासारख्या समर्थाशी कोणी भांडत बसावे ?’’ असे म्हणशील तर उद्धवा ! असे म्हणणे बरोबर नाही कारण मी जी तुझी शपय वाहिली, ती परमात्म्याचीच शपथ होय. ती सर्वथैव खरी आहे असे समज. उद्धवा ! तू माझा परिपूर्ण आत्मा आहेस. माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये मीतूपणाचा भेद नाही. त्या तुझी शपथ मी वाहिली, तिला परमात्मतत्त्व हेच थोर साक्षीदार आहे. पण मी सांगितलेल्या सिद्धांताला प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे प्रमाणच असताना आणभाक तरी कशाला पाहिजे ? सर्वभावाने तू मला शरण आलास, तर आताच्या आताच तरशील असे समज. मला प्रेमाने शरण आलास तर कळिकाळसुद्धा तुझ्या पाया पडेल. मग बिचारे संसाराचे भय ते किती ? तुझ्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची छाती कोणाची आहे ? तू शरण आलास की, तत्काळ तुला माझेच सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा संसाराचे सर्व भय नाहीसे होईल आणि कळिकाळ तुला पाहून कांपावयाला लागतील. गवतामध्ये विस्तवाची ठिणगी पडून पेटली असता तो अग्नि अनेक अरण्यांतील झाडेच्या झाडे जाळून टाकतो, त्याप्रमाणे शुद्ध अंतःकरणाने तू मला शरण आलास तर संसाराचे अरण्य तू जाळून टाकशील.
“हृदयस्थाला शरण यावे हे खरे पण तो हृदयस्थ आम्हाला कळत नाही’’ असे तू म्हणशील, तर उद्धवा ! त्याचेही स्वरूप सांगतो ऐक. नाम, रूप, इत्यादिकांचा अभिमान सोडून उद्धवपण म्हणून जे काय स्फुरण राहते, तेच माझे हृदयस्थाचे स्वरूप होय असे समज. त्यालाच तूं शरण ये.
क्रमशः







