प्रतिनिधी /बेळगाव
निकालावेळी पोस्टमन सर्कलनजीक कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी वाढली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागला. लाठीचार्ज झाल्याने काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
जसजसे निकाल जाहीर होत होते तसतसे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. घोषणाबाजी करू नये असे पोलिसांनी सांगितले असतानाही घोषणाबाजी व हुल्लडबाजी करण्यात येत होती. पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱया कार्यकर्त्यांवर अखेरीस पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये काही कार्यकर्ते जखमीही झाले. जमावाला पांगविण्यासाठी केलेल्या लाठीचार्जमुळे कार्यकर्त्यांची धांदल उडाली.









