कास / वार्ताहर :
निसर्गाचे वरदान लाभलेल्या परळी खोऱ्यात पावसाळ्यात निसर्गाचा अनमोल नजराणा पहायला मिळतो. त्यातच मोठमोठे धबधबे प्रवाहीत होत असल्याने पर्यटकांचा लोढा दाखल होत आहे. मात्र, यापैकी काही हुल्लडबाज पर्यटक गैरवर्तन करून स्थानिकांसह अन्य पर्यटकांना दमबाजी करत त्रास देण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे हुल्लडबाजांनो सावधान! शांतपणे पर्यटनाचा आनंद लुटा. गावात जाऊन स्थानिकांनाच दमबाजी केल्यास गाठ माझ्याशी, असा इशारा परळी गटाचे माजी जि .प. सदस्य राजु भोसले यांनी दिला.
पावसाळा म्हटलं की, दऱ्याखोऱ्यांनी नटलेला परळी विभाग पर्यटकांचे खास आकर्षण ठरतो. या भागात ठोसेघर धबधबा, भांबवली धबधबा, केळवली धबधबा पर्यटकांना आकर्षित करत असल्याने पर्यटक भांबवली, केळवली, ठोसेघरात दाखल होत आहेत. सध्या कोरोनामुळे पर्यटस्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी असतानाही अनेक पर्यटक सुट्टीच्या दिवशी दाखल होत आहेत. यातील अनेक पर्यटक शांततेने निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र काही हुल्लडबाज टवाळखोर पर्यटक मोठ्याने आरडाओरडा करत इतरांना दारूच्या नशेत त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिकांनाच दमबाजी करत दादागीरीची भाषा करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे गावात जाऊन स्थानिकांनाच दमबाजी कराल तर याद राखा गाठ माझ्याशी असल्याचा इशारा राजु भोसले यांनी दिला.









