चीनमधून आता हिंसाचाराच्या घटना निदर्शनास येत आहेत. हुबेई प्रांतातून मोठय़ा संख्येत लोक बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असल्याने गर्दी आणि वाहतूक कोंडीची स्थिती उद्भवली आहे. चीनने सद्यकाळात टाळेबंदी शिथिल केली आहे. कॅनडाच्या द ग्लोब अँड मेल या प्रसारमाध्यमाने काही चित्रिफितींचा दाखला देत हुबेईला जियांगशी प्रांताशी जोडणाऱया सेतूवर हिंसाचार झाल्याचे म्हटले आहे.
प्रवेशद्वार खुले करण्यासाठी मोठा जमाव आरडाओरड करत असल्याचे चित्रफितीत दिसून येते. पोलिसांची काही वाहनेही संतप्त जमावाने उलटविली आहेत. हिंसाचार फैलावल्यावर सेतूवर पोलीस तैनात करत हुबेईमधून जियांगशी प्रांतातील प्रवेश रोखण्यात आला आहे. हा सेतू आता दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे.
टाळेबंदी शिथिल
वुहान शहरात राहणारे तसेच प्रकृती ठिक असणारे लोक बुधवारपासून कुठेही ये-जा करू शकतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राधिकरणाने रेल्वेसेवा सुरू केली असून लांब पल्ल्याच्या बसेसही धावू लागल्या आहेत. शुक्रवारपर्यंत सर्व महामार्ग खुले करण्यात आले आहेत. मागील आठवडय़ांमध्ये हुबेईत केवळ एक रुग्ण आढळून आला होता. हुबेईत आतापर्यंत 68000 रुग्ण सापडले असून यातील 3174 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 एप्रिल रोजी हुबेई येथील टाळेबंदी मागे घेतली जाणार आहे.









