रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवाशांत नाराजी
प्रतिनिधी / खानापूर
पॅसेंजर बंदची आता वर्षपूर्ती झाली तरी या गाडय़ा अद्याप सुरू करण्यात न आल्याने सामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. इतर ठिकाणी पॅसेंजर गाडय़ा सुरू असताना हुबळी-मिरज, लोंढा-मिरज मार्गावरील पॅसेंजर बंदचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मजूर, कामगार, भाजीविक्रेते, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासह सामान्य प्रवाशांचा रोजंदारीचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर 23 मार्चपासून हुबळी-बेळगाव-मिरज, लोंढा-बेळगाव-मिरजसह रेल्वे स्टेशनवर येणाऱयाöजाणाऱया सर्व प्रवासी रेल्वे गाडय़ा बंद करण्यात आल्या. यापूर्वी जवळपास पाच पॅसेंजर ये-जा करणाऱया आणि दहा एक्स्प्रेस येणाऱया-जाणाऱया अशा जवळपास काही गाडय़ांची ये-जा थांबली. हुबळी-मिरज, लेंढा-मिरज पॅसेंजरला बहुतांश प्रवाशांची ये-जा असते. लेंढा-मिरज पॅसेंजरचा तिकीट दर कमी असल्याने सामान्यांना याची खूपच मदत
होते.
व्यावसायिकांचे हाल
23 मार्च 2020 पासून पॅसेंजर बंद करण्यात आल्या आहेत. याला आता वर्ष पूर्ण झाले तरी या गाडय़ा अद्याप सुरू करण्यात आल्या नाहीत, याआधी मार्गावर पॅसेंजर गाडय़ा सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी हुबळी-मिरज, लोंढा-मिरज मार्गावर मात्र पॅसेंजर गाडय़ा सुरू करण्यात आल्या नाहीत.
रेल्वे बंद असल्यामुळे रेल्वे स्थानकावरील चहा, खाद्य पदार्थ, विक्रीचे स्टॉल पूर्णपणे बंद आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हुबळी-मिरज, लोंढा-मिरज पॅसेंजर गाडय़ा त्वरित सुरू कराव्यात, अशी प्रवासी जनतेची मागणी आहे.









