प्रतिनिधी, वार्ताहर/ बेंगळूर, हुबळी
कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या तरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. राज्यात सोमवारी 15 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये हुबळीच्या एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. तसेच बेळगाव जिल्हय़ातील कुडची आणि मंडय़ा जिल्हय़ात प्रत्येकी 3, बिदरमध्ये 2, बागलकोट, बेंगळूर शहर आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात प्रत्येकी एका रुग्णाचाही समावेश आहे. राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 247 इतकी आहे.
धारवाड जिल्हय़ातील हुबळीच्या मुल्ला गल्ली येथील 27 वर्षीय युवक 9 एप्रिल रोजी कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळला होता. आता त्याचा 37 वर्षीय भाऊ व भावाची तीन आणि पाच वर्षीय मुले तसेच 7 वर्षीय मुलीला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर हुबळीतील किम्स इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. या सर्वांना 9 रोजीच क्वारंटाईन करण्यात आले होते. सोमवारी त्यांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संसर्गबाधित रुग्ण आढळून आलेला परिसर सध्या कॅन्टोन्मेंट म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती धारवाडच्या जिल्हाधिकारी दीपा चोळन यांनी दिली. धारवाड जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांची संख्या 6 वर पोहोचली आहे. त्यातील एकजण संसर्गमुक्त झाला आहे.
मंडय़ा जिल्हय़ातील मळवळ्ळी येथे 8 एप्रिल रोजी आढळून आलेला 36 वर्षीय रुग्ण तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आलेल्यांच्या संपर्कात आला होता. आता त्याच्यामुळे 8 वर्षीय मुलगी, 60 वर्षीय आई आणि बहिणीच्या 18 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. या जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांची संख्या 8 वर पोहोचली आहे. बागलकोट जिल्हय़ातील मुधोळ येथेही सोमवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 27 वर्षीय या युवकाला तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून परतलेल्या 33 वर्षीय युवकाच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाला आहे.
बिदरमध्ये दोन नवे रुग्ण बिदरमध्ये सध्या 13 जण कोरानाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या शहरात सोमवारी दोन नवे रुग्ण आढळून आले. त्यापैकी 35 वर्षीय महिला यापूर्वी आढळून आलेल्या रुग्णाची मुलगी आहे तर आणखी एक 16 वर्षीय मुलगी त्याची पुतणी आहे. बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ातील दोड्डबळ्ळापूर येथील 39 वर्षीय व्यक्ती आणि बेंगळूर शहरातील एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे









