कोरोना काळात म्हापसा येथे पडला होता अडकून : फूटपाथवर कंठीत होता जीवन
दत्तप्रसाद वालावलकर / ओरोस:
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे बेघर अवस्थेत गोवा येथे फुटपाथवर जीवन जगणाऱया हुबळी येथील मंजुनाथला अखेर जीवन आधारचा आधार मिळाला आहे. गोवा-फोंडा यथील ‘मॉ आसरो’ या सेवाश्रमात त्याला निवारा देण्यात आला आहे.
‘जीवन आधार’ ही रस्त्यावरील निराधार बांधवांना शोधून त्यांची सेवा करणारी एक संस्था आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आता गोवा राज्यातील फोंडा येथे नवीन आश्रम सुरू करण्यात आला आहे. या आश्रमाचे संस्थापक संदीप परब आणि त्यांचे सहकारी म्हापसा येथील रस्त्यावरील निराधार बांधवांची विचारपूस करीत असताना शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेला माणूस त्यांच्या नजरेस पडला.
मंजुनाथ नावाचा हा माणूस लॉकडाऊनच्या आधी आपल्या गावापासून कामानिमित्त गोव्यात आला. मिळेल ते काम करून चार पैसे तो कमवत होता. पण जेव्हा कोविड काळ आला, तेव्हा मंजुनाथचं काम गेलं. प्रवासाचे मार्ग बंद झाले होते. तो गोव्यामध्ये अडकून राहिला. कोविडमध्ये कडक निर्बंध असल्याने त्याची खाण्यापिण्याचीही आबाळ झाली. आंघोळ तर दूरच. पावसाळय़ात मात्र त्याची स्थिती फारच बिकट झाली. फूटपाथवर राहत असल्याने पावसात भिजत होता. तेच-तेच कपडे घालून राहिल्याने त्यांच्या अंगावर खरुज झाली. स्वच्छता नसल्याने त्वचेच्या आजारांनी डोकं वर काढलं. या सर्व गोष्टीमुळे मंजुनाथला बघून लोक दूर जाऊ लागले. त्याला कोण कामही देईना. आता तो मनानेही खचला होता. अशाही परिस्थितीत तो दीड वर्षे जगला. आता कोविडचे प्रमाण कमी झाले. पण मंजुनाथची परिस्थिती बिकटच होती. दरम्यान तो घर विसरला, खरुज आणि त्वचा रोग यांच्यामुळे तो बेजार झाला. आता त्याला निवारा मिळाला आहे. आश्रमात आणताच त्याला संदीप परब यांनी आंघोळ घातली. जेवण सुरू झालं. वैद्यकीय उपचारही सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती संदीप परब यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. प्रसाद आंगणे, दीपक चौरे, अजय गांगुर्डे, सुरेश जगताप, देविदास आंगणे या आपल्या सहकाऱयांबरोबरच पोलिसांचेही चांगले सहकार्य लाभल्याचे परब यांनी सांगितले.









