वार्ताहर / हुपरी
अभयारण्यात असलेल्या कळपातून भरकटलेल्या गव्या रेड्याने हुपरी, पट्टणकोडोलीच्या शिवारात वास्तव केले असून तळंदगे रोडवर असलेल्या शेतात रात्री 3 वाजण्याच्या सुमारास बेधडकपणे फिरत असताना शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. या गव्या रेड्याकडून पिकाची नासधूस आणि मानवावर हल्ला करण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र चालू आहे. सदर गव्या रेड्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्ग व नागरिकांच्याकडून होत आहे.
तळंदगे ते तळंदगे फाटा रोडच्या दोन्ही बाजूस असलेल्या आप्पासाहेब लड्डे(पट्टणकोडोली), अरुण धोंगडे, सर्जेराव धोंगडे, कल्लाप्पा गाट, सुकुमार शिराळे यांच्या शेतातून रात्री 3 वाजण्याच्या सुमारास गवा रेडा पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या रानातून तळंदगेकडे जात असताना त्यांच्या निदर्शनास आला. जवळपास असलेल्या जनावरांना वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. नुकताच कालकुंद्री –कुदनूर या गावात गव्याने एका धनगरासह महिलांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ताजीच असल्याने शेतकऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या गवा रेडा हुपरी, पट्टणकोडोली, तळंदगे, इंगळी , यलगुड व पंचतारांकित औद्योगिक वसाहत एवढ्या भागाच्या शिवारात संचार करीत असताना अनेकांच्या निदर्शनास येत आहे. कळपातून बाजूला गेल्यामुळे भिरमिटलेल्या गव्याचे शेतात काम करणाऱ्या शेतकरी वर्गात घाबराहट निर्माण झाली आहे. वनविभाग खात्याने ताबडतोब गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.