हुपरीत 24 तासात दोघांचा बळी
प्रतिनिधी / हुपरी
हुपरी येथे नऊ डॉक्टर्स, चांदी उद्योजक, बँकेचे व संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह 207 जणांवर कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांची सख्या अखंडितपणे वाढत असल्याने नागरिकांच्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान पी. ए.सी.च्या माहितीनुसार 85 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मात्र कोरोनाने एकूण नऊ जणांचा बळी घेतला आहे. अतिभयंकर बाब म्हणजे गेल्या २४ तासात २ करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे हुपरीत शहरात व परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपरिषदेमार्फत वारंवार शहरातून गाडी फिरवून सुरक्षित राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हुपरीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे मिटर सुसाट सुटले आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एक महिला आणि एक पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात भीतीते वातावरण निर्माण झाले असून हुपरीतील कोरोना रुग्णाचा आकडा 207 वर पोहचला आहे. हुपरी हे शहर कर्नाटक सीमेलगत असल्याने त्या भागातील व परिसरातील सहा ते सात गावाचे केंद्र असून मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. याकडे शासनाने व प्रशासनाने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाय करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
.