‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले विचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये दिल्लीतील हुनर हाट मेळाव्याचा उल्लेख करत कलेबरोबर रोजगाराचे मोठे माध्यम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ चा रविवारी 62 वा कार्यक्रम होता. त्यांनी या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करत हुनर हाटमध्ये देशाचा रंग दिसत असून, आपल्या देशाची विविधता प्रेरणादायक असल्याचे श्रोत्यांना सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱयाच्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून आपले विचार मांडले.
ते म्हणाले की, हुनर हाट कारागिरांच्या स्वप्नांना बळ देत आहे. या हाटमध्ये जवळपास 3 लक्ष लोकांना काम मिळाले आहे. हुनर हाटच्या या छोटय़ाशा जागेत देशाची विशालता, संस्कृती, परंपरा, खाद्यपदार्थ आणि भावनांच्या विविधतेचे दर्शन घडत आहे. दिल्लीच्या हुनर हाट येथे मोदींनी भेट देत तेथे त्यांनी लिट्टीचोखा या खाद्यपदार्थाचा आस्वादही घेतला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी त्याठिकाणचे अनुभव सांगितले. हुनर हाटचा ‘भारतीय संस्कृती समागम स्थळ’ असा उल्लेख करत त्याठिकाणी जाऊन कलाकारांचा उत्साह वाढवण्याचे आवाहन त्यांनी श्रोत्यांना केले.
महिलांचे विशेष कौतुक
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भागिरथी अम्मा, काम्या कार्तिकेयन यांच्यासह पूर्णियाच्या महिलांचे विशेष कौतुक केले. याशिवाय तरुणांना विज्ञानाशी जोडण्यासाठी इस्रोने युवा विज्ञानी कार्यक्रमाची सुरुवात केली असल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी या वेळी केला.