भजी खाण्याची इच्छा बेतली जीवावर
प्रतिनिधी /बेळगाव
भजी खाण्याची इच्छा एका माय-लेकाच्या जीवावर बेतली आहे. हुदली (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली असून शेतातील कामे आटोपून सायंकाळी घरी आल्यानंतर भजी तळून सेवन केलेल्या आई व मुलाचा अन्न विषबाधेने मृत्यू झाला आहे.
पार्वती मारुती मळगली (वय 53) तिचा मुलगा सोमनिंगाप्पा मारुती मळगली (वय 28) अशी त्यांची नावे आहेत. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरच होणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार पार्वती व मुलगा सोमनिंगाप्पा हे दोघे रविवारी शेताकडे गेले होते. सायंकाळी शेताहून परतल्यानंतर या माय-लेकाला भजी खाण्याची इच्छा झाली. मात्र भजी खाल्ल्यानंतर रात्री दोघांना उलटय़ा सुरू झाल्या. सुरूवातीला स्थानिक डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले. रात्री उशीरा सोमनिंगाप्पाचा मृत्यू झाला तर अत्यवस्थ अवस्थेत इस्पितळाला हलविताना पार्वतीचाही मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर पुढील तपास करीत आहेत. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच विषबाधेचे कारण समजू शकणार आहे.









