1 लाख 870 रुपये, 15 मोबाईल जप्त : मारिहाळ पोलिसांची कारवाई, पुढील तपास सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
हुदली येथील एका घरात सुरू असलेल्या मटका अड्डय़ावर छापा टाकून 30 जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सीईएन व मारिहाळ पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून या अड्डय़ावर 1 लाख 870 रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.
सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकाऱयांनी शुक्रवारी हुदली येथील एका घरावर छापा टाकला. घरात मटका घेतला जात होता. पोलिसांनी 30 जणांना अटक करुन त्यांना मारिहाळ पोलीस स्थानकात आणले.
रोख रक्कमेबरोबरच 15 मोबाईल संच व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. कर्नाटक पोलीस कायदा 78 (3) व संसर्गजन्य रोगराई प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. घरात सुरू असलेल्या मटका अड्डय़ावरुन चिठ्ठय़ा कोणाला पोहोचविण्यात येत होत्या. याची माहिती मिळविण्यात येत आहे.
कोरोनाचीही घेतली जाते काळजी
पोलिसांनी या अड्डय़ावर छापा टाकला त्यावेळी अधिकाऱयांना धक्काच बसला. सध्या कोरोना महामारी थोपविण्यासाठी वेगवेगळय़ा आस्थापनांत प्लास्टीकचे पडदे मारले आहेत. ग्राहक आणि दुकानदार यांच्यामध्ये हा पडदा असतो. केवळ पैसे घेण्यासाठी एक छोटी खिडकी उघडी असते. अशीच व्यवस्था घरातही केली होती. मटका लावण्यासाठी येणाऱयांना पडद्याबाहेर उभे केले जात होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मटका अड्डा चालकांनी काळजी घेतली होती.









