प्रतिनिधी / कोल्हापूर
हुतात्मा शंकरराव तोरस्कर कला-क्रीडा-शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट, बापूजी साळुंखे स्केटींग प्रशिक्षण केंद्र व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतीदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शनिवार दि. 25 जानेवारी 2020 रोजी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौक ते तोरस्कर चौक अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत जिम्न्यॅस्टिक व स्केटींगचे खेळाडू सहभागी होणार आहेत. अशी माहिती ट्रस्टचे सचिव संजय तोरस्कर यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
संयुक्त महाराष्ट्र लढयात 25 जानेवारी 1956 रोजी पहिले बलिदान देणारे कोल्हापूरचे शंकरराव दत्तात्रय तोरस्कर आहेत. त्यांच्या दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बुधवार पेठ, तोरस्कर चौकातील स्मृती स्तंभाचे सकाळी 10 वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेविका सरिता मोरे, नगरसेवक जय पटकारे, हुतात्मा शंकरराव तोरस्कर यांचे बंधू दिनकरराव तोरस्कर, आनंदराव तोरस्कर, विलासराव तोरस्कर, स्केटींग केंद्राचे प्रशिक्षक भास्कर कदम आदींच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही तोरस्कर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.