प्रतिनिधी /सातारा :
भारत आणि चीन दरम्यान तणावपूर्ण वातावरण सुरू असताना पाटण तालुक्यातील दुसाळे येथील सचिन संभाजी जाधव धारातिर्थी पडला. त्याचे पार्थिव जन्मगावी शनिवारी आले. यावेळी शहीद नायक सचिन संभाजी जाधव यांच्यावर शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना मानवंदना दिली. शासनाच्या वतीने सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. शोकाकूल वातावरणात दुसाळे ग्रामस्थांनी सचिन जाधव अमर रहे च्या घोषणा दिल्या. यावेळी कुटुंबियांसह ग्रामस्थांना शोक अनावरण झाला होता.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, पाटणचे तहसीलदार समीर यादव यांनीही आदरांजली वाहिली.
भारत व चीन दरम्यान लेह लडाख येथे तणावपूर्ण वातावरण आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत देशासाठी लढताना पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र सचिन संभाजी जाधव यांना वीरमरण आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी कश्मीर येथून रात्री पुण्याकडे विमानाने आले. त्यानंतर शनिवारी सकाळी पार्थिव दुसाळे गावात पोहोचले. दुसाळे ग्रामस्थ पार्थिवाची आतुरतेने वाट पहात होते. पार्थिव येताच कटुंबियांसह ग्रामस्थांचा शोक अनावर झाला. आपल्या गावचा सुपुत्र देशाच्या कामी आला असे म्हणत सचिन जाधव अमर रहे अमर रहे च्या गगनभेदी घोषणा दिल्या जात होत्या.
सातारा जिह्यातील 111 इंजिनियर रेजिमेंटचे नायक सचिन संभाजी जाधव यांना दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी सैन्यामध्ये सेवा बजावताना वीरमरण प्राप्त झाले होते. दुसाळे गावातून सजवलेल्या गाडीतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ते नियम पाळून ग्रामस्थांनी आपल्या शूर भूमिपुत्राचे अतिशय शोकाकुल वातावरणात शेवटचे दर्शन घेतले.









