वाळवा / वार्ताहर
वाळवा येथे पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू केली आहे. कारखाना स्थापनेपासुन हा उपक्रम सुरु आहे अशी माहिती हुतात्मा संकुलाचे नेते व साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली.
वैभव नायकवडी म्हणाले ऊस तोडणी मजुरांची मुले सहा महिने शिक्षणाच्या प्रवाहापासून बाजूला जातात, याची दखल घेऊन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी कारखाना स्थापनेपासून मुलांना शिक्षण मिळावे म्हणुन ३०-३५ वर्षांपासुन साखर शाळा चालू केली. ही राज्यातील पहिली साखर शाळा असून सरकारने याच धर्तीवर साखर कारखान्यांनी परिसरात साखर शाळा चालवण्यासाठी अध्यादेश काढला, त्यामुळे या साखर शाळेचे मोठे महत्व आहे. या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ती न चुकता प्रत्येक वर्षी भरविली जाते, असे वैभव गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना जेवण, वह्या, पुस्तके आदी सर्व साधने दिली असून त्यांचा शैक्षणिक उत्साह वाढावा यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. असे त्यांनी सांगितले. कारखाना वरिष्ठ अधिकारी बी. एस. माने म्हणाले मुलांची काळजी घेतली जाते, त्यामुळे त्यांचे संरक्षण होऊन आई-वडिलांची काळजी मिटते. त्यामुळे पालक उस्फूर्तपणे मुलांना शाळेत पाठवत आहेत.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.हाशीम वलांडकर यांनी केले. वलांडकर म्हणाले या वर्षी ६२ मुले मुली शिक्षण घेत आहेत. वैभव नायकवडी यांचे स्वतः या उपक्रमांवर लक्ष असुन विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्वल आहे. शिक्षिका सुप्रिया भगरे, राजक्का अहीर, तसेच शेती अधिकारी पी.ए. चव्हाण, डॉ. नितीन नायकवडी, दिलीप पाटील, साखर कामगार पत संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय अनुसे यावेळी उपस्थित होते.