वार्ताहर / हुक्केरी :
येथील जुन्या बसस्थानकानजीक असलेल्या इलेक्ट्रिक व चप्पल दुकानास भीषण आग लागून सदर दोन्ही दुकाने खाक झाली. ही घटना शनिवारी दुपारी 3 वाजता घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. यात यश न आल्याने आगीत दुकानातील काहीच शिल्लक राहिले नाही. दरम्यान अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेला हुक्केरी अग्निशमन बंब येण्यास एक तासाहून अधिक वेळ लागला. तसेच यातील काही जवानांनी मद्यप्राशन केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील सदानंद नानाप्पा मगदूम यांचे जुन्या बसस्थानकानजीक इलेक्ट्रिकल व भाऊराव पांडूरंग कांबळे यांचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. दरम्यान शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास अचानक इलेक्ट्रिकल दुकानातून धुराचे लोळ बाहेर पडले व पाहता पाहता आगीने रौदरुप धारण केले. याचा फटका चप्पल दुकानासही बसला. आगीची घटना पाहून नागरिकांनी त्वरित अग्निशमन दलास फोन केला. सदर वाहने येईपर्यंत नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
नागरिकांनी संकेश्वर हिराशुगरच्या अग्निशमन केंद्रास व हुक्केरीतील अग्निशमन केंद्रास फोन केला होता. यावेळी 15 कि. मी. अंतरावरुन संकेश्वरचा अग्निशमन बंब अवघ्या अर्ध्यातासात घटनास्थळी दाखल झाला. मात्र केवळ अर्ध्या कि. मी. अंतरावर असलेल्या हुक्केरी अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल 1 तास उशीर झाला. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी अग्निशमन केंद्र प्रमुखांना घेराव घालून धारेवर धरले. आगीची घटना समजताच हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत. सदर घटनेत 1 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.









