वयाच्या तिसऱयावर्षीच अचूक लक्ष्यभेद : 8 वर्षांचे असताना भरधाव वेगाने ट्रक चालविल्याचा दावा
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाचा क्रूर हुकुमशहा किम जोंग उन यांचा उदोउदो करण्यासाठी दुष्प्रचाराचे सत्र सुरू आहे. किम जोंग उन हे वयाच्या तिसऱया वर्षीच 100 यार्ड्स अंतरावरील बल्बवर बंदुकीच्या गोळय़ांनी निशाणा साधत होते, असा दावा उत्तर कोरियात करण्यात येत आहे. याचबरोबर किम जोंग यांनी 6 वर्षांचे असताना रानटी अश्वावरून फेरफटका मारला होता, वयाच्या आठव्या वर्षी 80 मैल प्रतितासाच्या वेगाने ट्रक चालविला होता, अशी थाप उत्तर कोरियाच्या नागरिकांच्या गळी उतरविली जात आहे.
किम जोंग उन यांच्या जीवनावर आधारित नवे पुस्तक समोर आले असून यात अनेक विचित्र दावे करण्यात आले आहेत. या पुस्तकाला किम यांचे आत्मचरित्रही ठरविण्यात येत आहे.
किम जोंग उन यांनी वयाच्या 9 व्या वर्षी युरोपीय पॉवरबोट स्पर्धेत विजय मिळविला होता. गिर्यारोहणाच्या उपकरणांशिवाय 9 हजार फूट उंचीचे हिमाच्छादित माउंट पेइकटू हे शिखर सर केले होते असे सर्व विचित्र दावे उत्तर कोरियाच्या जनतेसमोर केले जात आहेत.
किम जोंग उन यांचा कथित जीवनपट पत्रकार अन्ना फीफील्ड यांनी शब्दबद्ध केला आहे. वयाच्या 11 व्या वर्षी किम कंबरेला पिस्तूल बांधून चालायचे. किम यांना वयाच्या 12 व्या वर्षी स्वीत्झर्लंडमध्ये पाठविण्यात आले होते आणि ते बेर्न शहरात राहत होते. 2009 साली किम 25 वर्षांचे असताना उत्तर कोरियात त्यांचा पुतळा उभारण्यात आला होता. किम जोंग उन एका लक्ष्याला 10 सेकंदांत 10 वेळा भेदू शकतात, असा दावा करण्यात येतो. किम जोंग हे सैन्याच्या तिन्ही दलांविषयी पूर्णपणे परिचित आहेत असे फीफील्ड यांनी म्हटले आहे.









