नंदगड पोलिसात गुन्हा दाखल, खानापूर तालुक्यातील मास्केनहट्टी येथील घटना
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यातील मस्केनहट्टी गावात पती, सासू, सासरा व दिरांनी हुंडय़ासाठी सुनेला जाळून मारल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी नंदगड पोलिसांनी वरील सर्वांविरुद्ध हुंडय़ासाठी छळ करून ठार मारल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
या घटनेची हकिकत अशी, धारवाड तालुक्यातील होसवळ गावचे फकिरप्पा हणमंत मातारी यांची कन्या अश्विनी (वय 21) हिचा विवाह खानापूर तालुक्यातील मस्केनहट्टी गावचा रामू गंगाराम भेंडीगेरी याच्याशी एक वर्षापूर्वी झाला होता. विवाहावेळी सासरच्या मागणीनुसार फकिरप्पा याने सोने, पैसा व इतर वस्तूंही दिल्या होत्या पण विवाहानंतर अश्विनीच्या सासरच्या मंडळींनी हुंडय़ासाठी तिचा छळ सुरुच ठेवला. यामुळे सासरच्या छळाला कंटाळून अश्विनी गेले काही महिने आपल्या माहेरीच रहात होती. पण गणेश चतुर्थीचे कारण सांगून सासरच्या मंडळींनी अश्विनीला मस्केनहट्टी येथे आणले. सासरी आल्यानंतर पुन्हा छळ सुरू झाला. बुधवारी मध्यरात्री ती झोपल्याचे पाहून सासरच्या मंडळींनी तिच्या अंगावर रॉकेले ओतून तिला जाळले. यामुळे ती गंभीर जखमी झाली. यानंतर तिचा मृत्यू झाला. याची माहिती माहेरच्या मंडळींना समजताच अश्विनीचे वडील फकिरप्पा मातारी यांनी नंदगड पोलीस स्थानकात अश्विनीचा पती रामू गंगाराम भेंडीगेरी, सासरा गंगाराम भेंडीगेरी, जोतिबा गंगाराम भेंडीगेरी, तसेच राजश्री भेंडीगेरी यांच्याविरुद्ध आपल्या मुलीला हुंडय़ासाठी जाळून ठार मारल्याची फिर्याद दाखल केली आहे.
नंदगड पोलिसांनी 498 व 340 व 34 कलमाखाली गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.









