रस्त्याची दयनीय अवस्था : रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांसह नागरिकांचे हाल : 15 दिवसात रस्ताकामाला होणार सुरुवात
वार्ताहर / किणये
हुंचेनहट्टी-नावगे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच रस्त्याचा बहुतांशी भाग उखडून गेला असल्यामुळे वाहनधारकांना धूळमातीचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. अखेर नागरिकांच्या मागणीचा विचार करून लवकरच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी माजी महापौर विजय मोरे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, एपीएमसी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, आदींनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता संजीवकुमार यांची भेट घेऊन रस्त्याबाबत सविस्तर चर्चा केली. येत्या 15 दिवसात रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती अभियंते संजीवकुमार यांनी दिली आहे, असे शिवाजी सुंठकर यांनी सांगितले.
हुंचेनहट्टी ते नावगे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून हुंचेनहट्टी, बाळगमट्टी, बामणवाडी, नावगे आदी भागातील नागरिकांची या रस्त्यावर नेहमी वर्दळ सुरू असते. मात्र रस्त्यावर असलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांचे त्रास होऊ लागले आहेत. तसेच कुट्टलवाडीनजिक सरकारी धान्यसाठय़ाचे गोडावून आहे. यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते.
गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. अखेर नागरिकांच्या मागणीचा विचार करून प्रशासनामार्फत या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांकडून मिळाली. त्यामुळे परिसरातील नागरिक व वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.