ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
जागतिक स्तरावर अनेक देशांच्या चिंतेत भर घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिंयटचा फैलाव झपाट्याने होत आहे. या पार्श्वभुमीवर अनेक देशांनी कोरोना नियमावली आखुन देत निर्बंध लागु करणे सुरु केले आहेत. याचबरोबर भारतात ही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचं वातावरण पसरले आहे. याबरोबरच महाराष्ट्रात ही ओमिक्रॉनची संख्या वाढती आहे. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण त्या तुलनेत कमी असल्यामुळे ही आरोग्य यंत्रणेसाठी आणि प्रशासनासाठी दिलासादायक बाब ठरली आहे.
मात्र, असं असलं, तरी लोकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी राज्यातील करोनाची परिस्थिती आणि शाळा-कॉलेजांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते…
आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर बोलताना भाष्य केलं. “पुढील वर्षी फेब्रुवारी काय किंवा आत्ता काय. वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकतो. पण पॅनिक होण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. विनाकारण घराबाहेर पडू नका. ओमिक्रॉन गंभीर नसल्याचा सगळीकडे समज आहे. तशी निरीक्षणं देखील दिसत आहेत. पण ते तसंच राहील का ? यावर सविस्तर संशोधन झालेलं नाही. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.








