ऑनलाईन टीम / बीड :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून परळीतील सराफा व्यापारी आणि त्याच्या सहकाऱयांना केलेल्या मारहाणीवरुन भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडेंनी बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निषाणा साधला. परळीतील व्यापारी आणि त्याच्या सहकाऱयांवर झालेला अन्याय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांची पायमल्लीच आहे, असे टीकास्त्र त्यांनी डागले.
धनंजय मुंडे यांच्या समर्थर्कांनी काही कारणांवरुन सोमवारी सराफा व्यापारी अमर देशमुख आणि त्यांच्या सहकाऱयाला बेदम मारहाण केली होती. त्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर परळीत पालकमंत्र्यांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरीला बळ मिळत असल्याचा आरोप भाजपने केला होता.
त्यानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर निषाणा साधला. ‘शिवजयंतीच्या पूर्वसंधेला महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांची पायमल्ली आहे.
परळीत गुंडागर्दी, हप्तेखोरी, माफियाराजला आश्रय द्यायचा आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर, गुन्हे दाखल केल्यानंतर मग गय करणार नाही, अशी भाषा करायची हा दुटप्पीपणा आहे. गुंडांचे आत्मबळ वाढवणारे पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव आहे, असे पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.









