सांगली/प्रतिनिधी
सांगली शहरात हिसडा टोळी कार्यरत झाली असून या हिसडा टोळीकडून आता प्रत्येक भागात चेन स्नॅचिंग सुरू झाले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी अडीच वाजता सहयोगनगर येथील रस्त्यावर एका शिक्षक महिलेच्या गळ्यातील ७० हजार किमंतीचे दोन मंगळसूत्र या हिसडा टोळीने पळवून नेली आहेत. याबाबत भावना सुनील कुलकर्णी वय ४४ रा. चैतन्य बंगला, सहयोगनगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भावना कुलकर्णी या शनिवारी एका वास्तुशांतीसाठी गेल्या होत्या. या वास्तुशांतीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या त्यांच्या दुचाकीवरून घरी येत होत्या. सहयोगनगर येथील एमएसईबीच्या टॉवरजवळ त्या आल्या असता त्यांच्या गाडीच्या मागून एक दुचाकीस्वार आला. कुलकर्णी यांना काही समजण्याच्या आधीच त्यांने त्यांच्या गळ्यात हात घातला आणि गळ्यातील दोन्ही मंगळसुत्र खेचून तो पसार झाला. कुलकर्णी यांना काही समजण्याच्या आधीच हा प्रकार घडला. कुलकर्णी यांनी तात्काळ गाडी बाजूला लावून आरडोओरडा केला पण तोपर्यंत हा दुचाकीस्वार पसार झाला होता. त्यामुळे त्या दुचाकीचा क्रमांकही त्यांना पाहता आला नाही.
दरम्यान, त्यांनी ही घटना कुंटुंबियांना सांगितले कुटुंबियांनी तात्काळ याची माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी याठिकाणी येवून पाहणी केली तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. त्यामुळे हा चोरटा लवकरच पोलीसांच्या हाती येईल असे पोलीसांच्याकडून सांगण्यात आले दोन दिवसात याच भागात दुसरी घटना दोन दिवसापूर्वी याच रस्त्यावर एका युवतीच्या गळ्यातील चैन एका दुचाकीस्वारांने हिसडा मारून पळवून नेली होती. “त्याची नोंदही विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान या परिसरातील निर्जन रस्त्याचा लाभ हे चोरटे घेत असल्याने या भागात पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.









