सांगली/प्रतिनिधी
हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून खटल्यातील दोघा आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुधीर सदाशिव घोरपडे (वय 24) आणि रवींद्र रामचंद्र कदम (वय 23) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवलेकर यांनी ही शिक्षा सुनावली.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, सुधीर घोरपडे यांची बहीण विद्याराणी यांचे लग्न हिवरे येथील शिंदे कुटुंबात झाले होते. लग्नानंतर तिचे सासरचे लोक तिचा छळ करत असल्याचा तिच्या माहेरच्यांचा आरोप होता. दरम्यान, विद्याराणी यांनी आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून तिचा सासरच्या लोकांकडून घातपात झाल्याची फिर्याद विटा पोलिसांत दाखल करण्यात आली. या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटले होते.
सुधीर त्यामुळे शिंदे कुटुंबीयावर चिडून होता. 21 जून 2015 रोजी सुधीर आणि रवींद्र हे दोघे शिंदे वस्तीवर आले. त्यावेळी घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. घरात तीन महिला होत्या. सुधीर घोरपडे याने पाणी मागण्याचा बहाणा करून प्रभावती शिंदे यांना घरात पाठविले त्यावेळी या दोघांनी घरासमोर बसलेल्या निशिगंधा शिंदे व सुनीता पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या दोघींच्या ओरडण्याच्या आवाजाने प्रभावती शिंदे बाहेर आल्या तेव्हा त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यांचाही त्यात मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांनाही न्यायालयाने दोषी ठरवले होते. अखेर या दोघां आरोपींना न्यायालयाने आज शिक्षा सुनावली.








