कोरोनाकाळात रसायनमुक्त, नैसर्गिक आणि सेंद्रिय आहाराचं महत्त्व सर्वांना पटलं आहे. बबिता भट्ट लहानपणीपासून सेंद्रिय आणि नैसर्गिक आहाराचं महत्त्व जाणून आहेत. बबिता यांचं बालपण उत्तराखंडमधल्या गढवाल पर्वतरांगांमध्ये गेलं. याच काळात त्यांना हिमालयातल्या अत्यंत संपन्न आणि वैविध्यपूर्ण पिकांची ओळख पटली. या काळात त्यांना अत्यंत चविष्ट, नैसर्गिक आणि सेंद्रिय अन्न खायला मिळालं. लग्नानंतर त्यांना मोठय़ा शहरात जावं लागलं. इथे त्या सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी करू लागल्या. सॉफ्टवेअर क्षेत्रातली नोकरी म्हणजे उत्तम पगार. त्यातच मोठय़ा शहरात राहण्याची संधी मिळाल्यामुळे सगळी सुखं त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. नोकरीमुळे त्या आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होत्या. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत होत्या. त्यामुळे बबिता यांचं सगळं खूप छान सुरू होतं. मात्र मुलीच्या जन्मानंतर त्यांना एका गोष्टीची जाणीव झाली आणि त्यानंतर त्यांनी बदल घडवण्याचा निर्णय घेतला.
मुलीसाठी चांगल्या आणि सकस अन्नाचा शोध घेत असताना असं अन्न उपलब्ध नसल्याचं त्यांना दिसून आलं. बाजारात मिळणारं अन्न अनैसर्गिक, प्रक्रिया केलेलं आणि रसायनयुक्त असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. गढवालसारख्या निसर्गसंपन्न वातावरणात बालपण गेल्याने बबिता यांना असं अन्न काही रूचलं नाही. शहरात मिळणार्या प्रत्येक प्रकारच्या अन्नात भेसळ असल्याचं तसंच हे अन्न रसायनांनी भरलेलं असल्याचं त्यांना जाणवलं. आपल्या लहानग्या मुलीसाठी असं अन्न योग्य नसल्याचं त्यांना वाटत होतं. बबिता यांना हिमालयातल्या वैविध्यपूर्ण पिकांची आठवण येत होती. इथलं अन्न आणि वातावरण खूपच शुद्ध असल्याचं त्यांना जाणवत होतं. त्यामुळे शहरात नोकरी असली तरी त्यांना गढवाल खुणावत होतं.
मग 2016 मध्ये त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्या देहरादूनला आल्या. इथे त्यांनी ‘हिमालया टू होम’ची सुरुवात केली. हिमालयातला संपन्न वारसा देशातच नाही तर जगात प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. ‘हिमालया टू होम’च्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं धान्य तसंच अन्य पदार्थांची ऑनलाईन विक्री केली जाते. 2000 पेक्षा अधिक शेतकर्यांनी पिकवलेलं धान्यं त्यांच्या कंपनीमार्फत विकलं जातं. डाळी, पिठं, मसाले, तूप, काळं मीठ, लोणची, साखर, हर्ब्ज आणि चहा यांसारखी 140 पेक्षा अधिक उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादनात हिमालयाची शुद्धता आणि इथल्या मातीचा सुगंध आहे. बबिता यांची ही संकल्पना लोकप्रिय झाली असून देशभरातले चार हजारपेक्षा अधिक ग्राहक हिमालया टू होमशी जोडले गेले आहेत. प्रत्येक महिन्याला त्यांना तीन हजारपेक्षा अधिक ऑर्डर्स मिळतात. नोकरी सोडून अशा पद्धतीच्या वेगळ्या व्यवसायात उडी घेणं नक्कीच सोपं नाही. मात्र वेगळी वाट निवडण्यासाठी एक पाऊल पुढे टाकायलाच हवं. बबिता भट्ट यांनी स्वयंसिद्धा होत अनेकांना आधार दिला आहे.









