ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशातील एप्रिल आणि मे महिन्याचे लाईट बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे आता कनेक्शन कापण्यात येणार आहे. 30 जून पर्यंत विज बिल भरण्यासाठी देण्यात आलेली सूट समाप्त झाल्यावर वीज बोर्डाकडून बिल बुडवणाऱ्यांची यादी बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कोरोना संकटात आतापर्यंत जवळपास 550 कोटी रुपयांची वीज बिलांची रक्कम ग्राहकांनी भरली नाही. हिमाचल प्रदेशातील काही घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनी अजून बिलाची रक्कम भरली नाही.
मागील काही दिवसांपूर्वी या ग्राहकांना वीज बोर्डाकडून नोटीस पाठवून बिल भरण्या बाबत सूचनाही केली होती. विद्युत नियामक मंडळाने दिलेल्या शेवटच्या तारखे नंतर 15 दिवसात सुद्धा बिल न भरल्यास संबंधित ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येते. मार्चमध्ये लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर ग्राहकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन वीज बोर्डाकडून 30 जूनपर्यंत या नियमानुसार होणारी कारवाई थांबवली होती. मात्र, आता वीज बिलाची रक्कम जमा होत नसल्याने विज बोर्डाला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे त्यांना अन्य खर्च पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत.
त्यामुळे ज्या ग्राहकांनी वीज बिल भरले नाही अशा ग्राहकांची यादी तयार करण्याचे आदेश फील्ड अधिकाऱ्यांना दिले गेले आहेत. तसेच येणाऱ्या दोन आठवड्यात वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू केले जाईल.
वीज बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक आर के शर्मा यांनी सांगितले की, सरकारने लॉक डाऊनच्या काळात श्रेणीतील ग्राहकांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. तरी देखील काही ग्राहकांनी अजूनही वीज बिल भरले नाही. त्यामुळे अशा ग्राहकांची यादी तयार केली जात आहे.