ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेश सरकारने राज्यात प्रवेश देण्याबाबत नवीन नियम जारी केले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून लागू करण्यात आलेल्या नियमानुसार आता कोणत्याही व्यक्तीला हिमाचल प्रदेशात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारच्या नोंदणीची आवश्यक नसेल.
मात्र, क्वारंटाइन व्यवस्था अजूनही आरोग्य विभागाकडून लागू करण्यात आलेल्या नियमानुसारच सुरु राहणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, एखादा व्यक्ती जर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रातून हिमाचल प्रदेशात येणार असेल तर त्या संबंधित व्यक्तीस संस्थात्मक क्वारंटाइन केले जाईल.
कोरोनाचा कमी प्रादुर्भाव असलेल्या भागातून हिमाचल प्रदेशात येणाऱ्या लोकांना 10 दिवस होम क्वारंटाइन राहावे लागेल. यासोबतच संस्थात्मक आणि होम क्वारंटाइनचा नियम अशा लोकांना लागू नसेल जे आपल्या सोबत कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन येतील.









