सिमला / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला असून बुधवारी एका दिवसात सात जणांचा बळी गेला आहे. तसेच चार ते सहा जण बेपत्ता आहेत. ते वाहून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्याच्या कुल्लू जिल्हय़ात ही घटना घडली. येथे काही गावांमध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडत आहे. याच जिल्हय़ात मालना जलविद्युत निर्मिती प्रकल्प असून तेथे 25 कर्मचारी काम करीत होते. तेही पावसामुळे निर्माण झालेल्या पुरात अडकले होते. तथापि, त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. कुल्लू जिल्हय़ाच्या आणखी काही भागांमध्येही प्रचंड पाऊस होत आहे. आपत्ती निवारण आणि सहाय्यता दलाच्या 25 कर्मचाऱयांची तुकडी येथे नियुक्त करण्यात आली असून पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. लार्जे आणि पंडोह ही दोन धरणे पूर्णतः भरली असून त्यांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणांखालच्या भागात पूर आला आहे.









