ऑनलाईन टीम / सिरमौर :
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हिमाचल प्रदेशात देखील आता कोरोनाच्या संसर्गाने जोर धरला आहे. मंगळवारी सिरमौरमध्ये 8 नवे रुग्ण आढळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सोमवारी नमुन्यासाठी पाठवण्यात आलेल्या 41 नमुन्यांपैकी 33 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 8 पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व जण फार्मा इकाई या कार्यालयात काम करतात. 8 मधील 7 जण हरियाणामध्ये आहेत. यामध्ये कंपनीचा मालक, त्यांची पत्नी आणि मुलगा पंचकूलामध्ये, तर इकाईचे सीईओ यमुनानगर मध्ये, दोन जण साढौर मधील तर एकजण नारायणगढमध्ये आहे. याशिवाय एका व्यक्तीला त्रिलोकपूरमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे.
दरम्यान, सध्या सिरमौरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 20 आहे. त्यातील सोळा जणांवर उपचार सुरू असून चार जणांची प्रकृती सुधारली आहे. तर हिमाचल प्रदेश मध्ये कोरोना रुग्णांची संख्या 429 वर पोहोचली असून 197 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 223 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.