ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशात दुसऱ्यांदा कोरोना कर्फ्यूमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता प्रदेशात 31 मे च्या सकाळी 6 वाजेपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना शहरी आवास मंत्री सुरेश भारद्वाज यांनी सांगितले की, 31 मे पर्यंत प्रदेशात पाहिल्याप्रमाणेच निर्बंध असणार आहेत. आवश्यक वस्तूंची दुकाने पहिल्या प्रमाणेच तीन तास म्हणजेच सकाळी 8 ते 11 या वेळेत सुरू राहणार आहेत.
प्रदेशात जारी असलेला कोरोना कर्फ्यू 26 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यापूर्वी कोरोना कर्फ्यू 17 मे च्या सकाळी 6 वाजेपर्यंत लावण्यात आला होता. तर मंगळवारी आणि शुक्रवारी हार्डवेअरची दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत. या सोबतच शहरी भागात जेथे एका निगमचे डेपो आहेत, तिथे अंतिम संस्काराच्या विधीसाठी निःशुल्क लाकडे दिली जाणार आहेत. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी लाकडे कापण्यास परवानगी असेल तिथे लाकडे कापली जातील.
प्रदेशात दररोज 3 हजारच्या आसपास रुग्ण संख्या वाढत आहे. तर मृत्यूचा आकडा देखील 60 पर्यंत येत आहे. सद्य स्थितीत 30 हजारपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढते मृत्यूचे प्रमाण भीतीदायक आहे. तर प्रदेशात लागण झालेले 40 टक्के रुग्ण हे 40 ते 50 या वयोगटातील आहेत.









