प्रदेशाध्यक्षांसह तीन नेते भाजपमध्ये : नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
शिमला / वृत्तसंस्था
पंजाबमधील विजयानंतर हिमाचल प्रदेशात आपला ठसा वाढवण्याच्या तयारीत असलेल्या ‘आप’ला जोरदार झटका बसला आहे. दिल्लीत ‘आप’चे तीन नेते भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनुप केसरी, संघटनेचे सरचिटणीस सतीश ठाकूर आणि उना जिल्हाध्यक्ष इक्बाल सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याप्रसंगी अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केसरी यांनी केला. तसेच अनूप केसरी यांच्या भाजप प्रवेशावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आप नेत्यांची बैठक घेतली. दरम्यान, तिघांनाही पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी तिघांचे पक्षात स्वागत केले. अनूप केसरी हे दीर्घकाळ हिमाचल प्रदेशमध्ये आपचे प्रदेशाध्यक्ष होते. राज्यातील अनेक काँग्रेस आणि भाजप नेते ‘आप’मध्ये प्रवेश करत असतानाच ‘आप’च्या या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. गेल्या काही दिवसात अनुप केसरी हे पक्षात दुर्लक्षित राहिले. त्यांच्यावर काही कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप होता. पक्षाकडून त्याची चौकशी करण्यात येत होती. त्यामुळेच त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.









