आपल्या पूर्वायुष्यात केवळ चूल आणि मूल यात गुंतलेल्या पण उत्तर आयुष्यात यशस्वी उद्योजिका होण्यापर्यंतचा टप्पा गाठलेल्या हिमाचल प्रदेशमधील तीन महिलांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. घरात स्वयंपाक करता करता त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी विविध खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आता हा व्यवसाय भरभराटीला आला असून महिला सबलीकरण आणि आत्मनिर्भरता यांचा आदर्श या महिला बनल्या आहेत, असे बोलले जात आहे.
हिमाचल प्रदेशमधील नुरपूर येथे आंब्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. आंब्यापासून पापड बनविण्याचा व्यवसाय येथे पूर्वापारपासून आहे. तथापि, याच नुरपूरमधील या तीन महिलांनी विविध प्रयोग करून नव्या चवींचे आणि अधिक पौष्टिक अशा स्वरुपाचे पापड बनविण्यात यश मिळविले. 2014 मध्ये त्यांनी हे पापड विकण्याचा उपक्रम सुरू केला. आता या उपक्रमात देशी हळद, विविध प्रकारची लोणची, चटण्या आणि गाईचे शुद्ध तूप इत्यादी पदार्थांची भर पडली आहे. त्यांची उलाढाल काही कोटींपर्यंत गेल्याचे सांगितले जाते.
आंब्याचे पापड आणि देशी हळद यांना भारतात तसेच भारताबाहेरही प्रचंड मागणी आहे. ही स्थिती लक्षात घेऊन या महिलांनी याच व्यवसायात नाव कमावण्याचा निर्धार केला. हा व्यवसाय अनेक जण करीत असल्याने त्यांना उत्पादनांचे स्वरुप बदलावे लागले. नव्या चवीच्या त्यांच्या पदार्थांना त्यामुळे अधिकच मागणी येऊ लागली. त्यांनी स्वसाहाय्य गट स्थापन करून हिमाचल प्रदेश सरकारकडूनही आर्थिक साहाय्य मिळविले. ऑनलाईन पद्धतीने बाजारपेठ निर्माण करून त्यांनी मिळविलेले हे यश कौतुकाचा विषय बनले आहे. आत्मनिर्भरतेच्या मंत्रावर या महिलांचा विश्वास असून बुद्धिचा उपयोग करून कष्ट केल्यास शिक्षण किंवा तत्सम बाबींचा फारसा आधार नसतानाही उद्योग-व्यवसायांमध्ये मोठे यश मिळविता येते, याचा वस्तुपाठच या महिलांनी घालून दिला आहे.









